महिलेवर अत्याचार करणारा आरोपी जेरबंद

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ८ जून
चामोर्शी पोलीस स्टेशन अंतर्गत २५ मे रोजी सायंकाळी आपले काम आटोपून घरी परत जाणाऱ्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस चामोर्शी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली आहे.
२५ मे रोजी सायंकाळी घरी परतणाऱ्या महिलेवर एका अनोळखी इसमाने अत्याचार करुन तिला जबर मारहाण केल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. मात्र आरोपी अनोळखी,त्यात महिलेवर अत्याचार झाल्याचे तीला मानसिक धक्का बसला होता. गडचिरोली पोलिस दलाच्या सखी वन स्टॉप सेंटरमधील समुपदेशकाने पिडीतेला विश्वासात घेऊन आरोपीची काहीशी ओळख पटवण्यात यश मिळवले आणि त्यावरुन स्केच तयार करून आरोपीला हुडकून काढले. आणि आरोपी चंद्रपूर येथे असल्याची माहिती मिळताच गडचिरोली स्थानिक गून्हे शाखेच्या पथकाने चंद्रपूर स्थानिक गून्हे शाखेच्या मदतीने बुधवारी जेरबंद केले. मिथून मडावी असे आरोपीचे नाव असून त्याला पूढील कारवाईसाठी चामोर्शी पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. सदरची कारवाई स्थानिक गून्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी आणि चामोर्शी चे पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या चमूने संयुक्तपणे पार पाडली.