व्हिजन गडचिरोली २०४७ कार्यशाळेत जिल्हावासीयांनी गुगल मीटद्वारे सहभागी व्हावे – आयोजकांचे आवाहन
१६ व १७ ऑगस्टला आर. के. सेलिब्रेशन हॉल येथे दोन दिवसीय कार्यशाळा; ऑनलाइन सहभागाचीही सुविधा
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली,दि.१६ ऑगस्ट
गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधून सन २०४७ पर्यंत ‘विकसित गडचिरोली’ निर्माण करण्याच्या दृष्टीने भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने व्हिजन गडचिरोली २०४७ या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्याचा २०४७ पर्यंतचा विकास आराखडा कसा असावा, जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, कोणत्या क्षेत्रांना प्राधान्य देणे आवश्यक आहे तसेच उपलब्ध नैसर्गिक, मानवी व आर्थिक संसाधनांचा योग्य वापर करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, यावर व्यापक विचारमंथन करण्यासाठी दि. १६ व १७ ऑगस्ट २०२६ रोजी आर. के. सेलिब्रेशन हॉल, गडचिरोली येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच दैनिक, टीव्ही आणि पोर्टल माध्यमांचे पत्रकार यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग, कृषी, सिंचन, पर्यटन, रस्ते व पायाभूत सुविधा, युवकांचे कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, आदिवासी विकास, पर्यावरण संरक्षण तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील विकासाच्या विविध मुद्द्यांवर या कार्यशाळेत चर्चा होणार आहे.
ऑनलाइन सहभागासाठी गुगल मीटची सुविधा
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला या विकासाच्या संकल्पनेशी जोडता यावे आणि प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांनाही कार्यशाळेचा भाग होता यावे, यासाठी आयोजकांकडून गुगल मीटद्वारे ऑनलाइन सहभागाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यासाठी कार्यक्रमाची गुगल मीट वेब लिंक तयार करण्यात आली असून जिल्हावासीयांनी सदर लिंक ओपन करून ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गडचिरोलीच्या विकासाबाबत आपल्या सूचना, कल्पना आणि अपेक्षा मांडण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आयोजकांनी म्हटले आहे.
‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली २०४७ कृती / निर्माण समिती’ यांच्या वतीने जिल्ह्यातील नागरिकांना या महत्त्वपूर्ण उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोलीचा विकास हा केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांचा विषय नसून संपूर्ण जिल्ह्याच्या भवितव्याचा विषय आहे. २०४७ मध्ये आपला जिल्हा कसा असावा, याचा आराखडा तयार करताना प्रत्येक नागरिकाचा सहभाग आणि प्रत्येक घटकाचे मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष तसेच गुगल मीटच्या माध्यमातून नागरिकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी विचार, सहभाग आणि कृतीची ही संधी असून, जिल्हावासीयांनी गुगल मीटची लिंक ओपन करून ‘व्हिजन गडचिरोली २०४७’ या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक ‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली २०४७ कृती / निर्माण समिती’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.


