विशेष वृतान्त

खाण कंपनीसाठी अवैधरित्या एन ओ सी देण्याचा प्रशासक व ग्रामसेवकांचा डाव ग्रामस्थांनी उधळला

सभा सुरू असतानाच लोकांनी प्रश्न विचारल्याने प्रशासक व ग्रामसेवकाने गणपूर्तीचे कारण पूढे करुन सभा तहकूब करीत नागरिकांची मागीतली माफी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ७ ऑगस्ट 

पूर्णसत्य च्या बातमीचा तात्काळ परिणाम 

पेसा कायद्याचे उल्लंघन करीत एटापल्ली तालुक्यातील जवेली खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वेलमागड गावची  अवैधरित्या घेण्यात येत असलेली ग्रामसभा नागरिकांनी शुक्रवारी उधळून लावली. प्रशासक आणि ग्रामसेवक यांनी सभा सुरू असताना लोकांनी सभेच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केले असता दोघांनी सभेची गणपूर्ती (कोरम) पूर्ण नसल्याचे तकलादू कारण देत सभा तहकूब करण्यात येत असल्याचे पत्र काढले. यावरुन नागरिकांनी संताप व्यक्त करताच प्रशासक आणि ग्रामसेवक यांनी नागरिकांची माफी मागत काढता पाय घेतला. 

पेसा कायद्याचे उल्लंघन करून लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीला एन ओ सी मिळवून देण्याच्या हेतूने प्रशासक मुन्ना पुंगाटी व ग्रामसेवक लता मडावी यांनी कंपनीच्या काही लोकांच्या  भूलथापांना बळी पडून डाव साधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी
नागरिकांची दिशाभूल करून २० जुलैची तारीख टाकून प्रत्यक्षात दोन दिवसांपूर्वी  सभेची नोटीस काढली. सभेत उपस्थित झालेल्या नागरिकांनी हरकत नोंदवून आजच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकत कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, यावेळी आपले पितळ उघडे पडण्याच्या भीतीने प्रशासक मुन्ना पुंगाटी व ग्रामसेविका लता मडावी यांनी ग्रामसभ सुरु असतांनाच सभा तहकुब झाल्याचे जाहीर करून दोघांच्याही संयुक्त सहीचे एक हमीपत्र देऊन चुक झाल्याची कबुली उपस्थित नागरिकांना दिली व समयसूचकता पाळत सभेतून काढता पाय घेतला.

उल्लेखनीय आहे की आमच्या पूर्णसत्य न्यूज नेटवर्क ने सभा सुरू असतानाच सभेच्या वैध हेतूवर शंका घेत अशामुळे ग्रामसभांची हकनाक बदनामी होत असल्याचे नमूद केले होते. त्याचा तात्काळ परिणाम दिसून आला.

वेलमागड येथे शुक्रवारी १२ वाजता पासून खनिज उत्खननासाठी सर्वेक्षण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ग्रामसभांच्या एन ओ सी साठी एक बैठक सुरू असल्याचे सांगितले गेले. या बैठकीत एक इच्छुक कंपनी साम दाम दंड भेद रणनीती वापरुन ग्रामसभांच्या एन ओ सी मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत होते. कंपनीच्या या अमिषाला काही ग्रामसभांचे लोक व प्रशासकीय कर्मचारी बळी पडले असल्याचे समोर आले. यामुळे ग्रामसभांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची संभावना व्यक्त होत असल्याचे त्या भागातील नागरिकांचे म्हणणे पूर्णसत्य न्यूज नेटवर्कने प्रकाशित केले. परिणामी नागरिकांनी कठोर भूमिका घेत प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा डाव उधळून लावला.

उल्लेखनीय आहे कीगडचिरोली जिल्ह्यात लोहखनिज उत्खननाचा मोठा घाट घातला जात असून यासाठी अनेक कंपन्या आपल्या विस्तारित प्रकल्पांसाठी प्रयत्नशील आहेत. यापूर्वीही मार्च एका कंपनीने प्रशासकिय स्तरावर बैठक बोलावून ग्रामसभांची एन ओ सी मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

 

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!