सेवानिवृत्त मुख्याध्यापक शांताराम शेंडे यांचे २७ ऑक्टोबर रोजी निधन; बुधवारी पंचतत्वात विलीन
शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदान; अनेक विद्यार्थी घडविणाऱ्या गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २८ ऑक्टोबर
गडचिरोली येथून जवळच असलेल्या सावली येथील सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक तथा चंद्रपूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षण संघाचे सावली तालुका कोषाध्यक्ष शांताराम किसन शेंडे (वय ८५) यांचे मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सावली गावासह गडचिरोली परिसरात शोककळा पसरली आहे.
शांताराम शेंडे यांनी आपल्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेदरम्यान विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच दिले नाही, तर त्यांच्यावर संस्कार करून त्यांना जीवनाच्या योग्य वाटेवर चालण्याची प्रेरणाही दिली. एक आदर्श शिक्षक आणि कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले असून, आज विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले त्यांचे विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची साक्ष देत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, शिक्षणाप्रती असलेली निष्ठा आणि विद्यार्थ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे ते सर्वांच्या स्मरणात कायम राहतील. त्यांच्या शिक्षकी पेशातील कार्य मोठे आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी मंदाताई, मुले गडचिरोली जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, आदिवासी विकास शिक्षक व कर्मचारी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे , प्रमोद व नितीन, सुना, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे.
बुधवार,२८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता सावली येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, माजी विद्यार्थी तसेच गावातील नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला.शांताराम शेंडे यांच्या निधनाने एक आदर्श शिक्षक, मार्गदर्शक आणि अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडविणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे ,अशी भावना परिसरातील नागरिक आणि माजी विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



