विशेष वृतान्त

एलएमजीएसईने महिला सक्षमीकरणाचे मोठे काम केले आहे : अमृता फडणवीस

लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड आंत्रप्रेन्युअरशिपचा भव्य पदवीदान सोहळा ; ४०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह रोजगाराची संधी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.१ जुलै 

लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड आंत्रप्रेन्युअरशिपने गडचिरोलीच्या विकासाला गती देतानाच जिल्ह्यातील महिला आणि युवतींना विविध प्रशिक्षण देऊन महिला सक्षमीकरणाचे मोठे काम केले आहे. याचे स्पष्ट चित्र प्रशिक्षण घेतलेल्या मुलींच्या डोळ्यांतील आत्मविश्वास आणि औद्योगिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करण्याची तयारी स्पष्टपणे दिसत आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध बँकर आणि समाजसेविका अमृता फडणवीस यांनी केले.

लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड आंत्रप्रेन्युअरशिप (एलएमजीएसई) तर्फे बुधवारी भव्य पदवीदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या नेत्रदीपक सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून  त्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन होते. तर ज्येष्ठ लोकप्रतिनिधी अरविंद नामदेवराव पोरेड्डीवार, लॉयड्स फेरा फोर्ज ग्लोबल प्रा. लि.च्या संचालिका अलका मिश्रा, लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या संचालिका कीर्थी रेड्डी तसेच लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे कार्यकारी संचालक एस. वेंकटेश्वरन हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

मुलींना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनविण्यासाठी संस्थेने घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. हा खऱ्या अर्थाने विकास असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.

लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड आंत्रप्रेन्युअरशिप (एलएमजीएसई) तर्फे बुधवारी भव्य पदवीदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विविध तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४०० विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच या सर्व विद्यार्थ्यांना लॉयड्स समूहामध्ये रोजगाराची संधीही उपलब्ध करून देण्यात आली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात बी. प्रभाकरन यांनी गडचिरोलीतील लॉयड्स-कर्टिन कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थी इग्नासियस बडा याने ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठातून इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केल्याचा विशेष उल्लेख केला. या विद्यार्थ्याच्या संपूर्ण शिक्षणाचा तसेच इतर सर्व खर्चाचा भार लॉयड्सने उचलला होता. या भागातील स्थानिक आदिवासी युवकाने परदेशातील विद्यापीठातून या विषयातील अशी पदवी प्रथमच संपादन केल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी हा अत्यंत समाधानाचा क्षण असल्याचे सांगितले. पुढे बोलताना प्रभाकरन म्हणाले की, बांधकाम क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय सर्वांगीण विकास शक्य नाही. त्यामुळे एलएमजीएसईच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन बांधकाम क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार केले जात आहे. आज मोठ्या संख्येने युवक-युवती प्रशिक्षण पूर्ण करून लॉयड्समध्ये रोजगार मिळवत असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. हे विद्यार्थी केवळ कर्मचारी राहणार नसून, ईएसओपी योजनेअंतर्गत कंपनीचे समभाग देऊन त्यांना कंपनीचे भागीदारही बनविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गडचिरोलीच्या विकासासाठी लॉयड्स कटिबद्ध असून त्यामागे देशाच्या विकासाचे व्यापक उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून हेडरी येथे उभारण्यात आलेल्या बहुविशेषता रुग्णालयाचा उल्लेख करत, या रुग्णालयामध्ये दररोज शेकडो रुग्णांवर मोफत उपचार केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

महिला चालकांसाठी शौचालय सुविधेसह सुसज्ज ट्रेलर ट्रक भारतात प्रथमच सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. महिलांनी वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, या उद्देशाने हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गडचिरोलीतील युवकांसाठी भविष्यात फ्लाइंग स्कूलही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लॉयड्सच्या विविध सामाजिक विकास प्रकल्पांचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यामध्ये लॉयड्स एकलव्य वसतिगृह, लॉयड्स शक्ती वसतिगृह, लॉयड्स भोजनालय, लॉयड्स ड्रायव्हिंग स्कूल, लॉयड्स सक्षम गॅरेज तसेच लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड आंत्रप्रेन्युअरशिपच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पांमुळे कौशल्य विकास, शिक्षण आणि समाज सक्षमीकरणासाठी संस्थेची बांधिलकी अधिक दृढ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या भव्य पदवीदान सोहळ्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि तांत्रिक यशाचा गौरव तर केलाच, शिवाय जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी आणि शाश्वत सामाजिक विकासाच्या माध्यमातून गडचिरोलीतील युवकांना सक्षम करण्याच्या लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड आंत्रप्रेन्युअरशिपच्या संकल्पनेलाही नव्याने अधोरेखित केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!