लॅायड्स इन्फिनिट फाउंडेशनतर्फे आस्ट्रेलियात शिक्षणासाठी जाणार गडचिरोलीचे प्रशिक्षणार्थी
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १३ जून
विदेशात जाऊन उच्चशिक्षण घेणे हे गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी केवळ एक स्वप्न ठरते. पण लॅायड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लि.च्या पुढाकाराने हे स्वप्न प्रत्यक्षात साकारले जात आहे. या शृंखलेत विद्यार्थ्यांची चौथी बॅच उच्चशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात पाठविली जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १३ ते २० जून या कालावधीत सुरू राहणार आहे. सामाजिक दायित्व उपक्रमातून लॅायड्स इन्फिनिट फाउंडेशनतर्फे त्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च उचलल्या जाणार आहे.
या उपक्रमातून समृद्ध आदिवासी संस्कृती जपणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात एक उल्लेखनीय शैक्षणिक क्रांती आकार घेत आहे. ती येथील तरुणांच्या भविष्याला नवी दिशा देत आहे. प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिक्षण घेण्याचे जे स्वप्न एकेकाळी दूरचे वाटत होते, ते आज एका दूरदर्शी उपक्रमामुळे वास्तवात उतरले आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांच्या दूरदृष्टीने आणि बांधिलकीने हा उपक्रम राबविला जात आहे.
यापूर्वी विद्यार्थ्यांच्या ३ बॅच उच्चशिक्षणासाठी पाठविल्यानंतर आणखी एका विद्यार्थी गटाला जागतिक स्तरावर आपली स्वप्ने साकार करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाचा खर्च लॅायड्स कडून केला जाणार आहे. यामध्ये संपूर्ण शिक्षण शुल्क, राहणीमानाचा खर्च तसेच शिक्षणकालावधीतील सर्व संबंधित खर्चांचा समावेश आहे.
फाउंडेशनकडून प्रत्येक विद्यार्थ्यावर दरवर्षी सुमारे ५० लाख रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. संपूर्ण अभ्यासक्रमासाठी प्रति विद्यार्थी अंदाजे दीड ते दोन कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. ही भरीव गुंतवणूक गडचिरोलीमध्ये दीर्घकालीन सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्या, युवकांना सक्षम करण्याच्या आणि त्यांना भविष्यातील नेतृत्वकर्ता तसेच प्रादेशिक विकासाचे प्रेरक बनविण्याच्या एलएमईएलच्या वचनबद्धतेचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे.



