विशेष वृतान्त

स्मार्ट मीटर सक्ती, बोगस व अवाजवी वीज बिलांविरोधात महावितरण कार्यालयावर आसपा व माकपाचे हल्लाबोल आंदोलन

अधीक्षक अभियंत्यांना आंदोलनस्थळी बोलावून जाब विचारला

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२५ जून 

गडचिरोली जिल्ह्यात महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर सक्ती, बोगस व अवाजवी वीज बिल, अंदाजे बिल आकारणी, ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष आणि बेजबाबदार कारभाराविरोधात आजाद समाज पार्टी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालय, गडचिरोली येथे तीव्र हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो नागरिक स्वतःच्या समस्या, तक्रारी आणि धक्कादायक वीज बिलांच्या प्रती घेऊन सहभागी झाले, त्यामुळे आंदोलनस्थळी जनआक्रोशाचे तीव्र चित्र पाहायला मिळाले.

यावेळी आंदोलनात उपस्थित नागरिकांनी महावितरणच्या मनमानी कारभाराचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आणले. गडचिरोली येथील दुर्गा कुरजेकर यांना घरगुती वीज वापरासाठी तब्बल ९९५४० रुपये इतके धक्कादायक वीज बिल आल्याची बाब आंदोलनात मांडण्यात आली. तसेच वाघोली येथील ७० वर्षीय वृद्ध महिला शेवंता कुमरे, ज्या एकट्याच कवेलूच्या छोट्याशा घरात राहतात आणि घरात केवळ दोनच लाईट आहेत, अशा परिस्थितीत त्यांना २७००० रुपये वीज बिल देण्यात आले. एवढेच नव्हे तर, हे बिल न भरल्याच्या कारणावरून महावितरणने त्या वृद्ध महिलेची वीज लाईनही कापली. परिणामी, गेल्या पाच महिन्यांपासून ती वृद्ध महिला अंधारात जीवन जगत आहे.  हा प्रकार अत्यंत अमानवी, असंवेदनशील आणि ग्राहकविरोधी असल्याचा गंभीर आरोप आजाद समाज पार्टीने यावेळी केला.

आंदोलनादरम्यान महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना थेट आंदोलनस्थळी बोलावून नागरिकांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यात आला. अधीक्षक अभियंत्यांनी प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी   टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

आंदोलनात आजाद समाज पार्टी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात अवाजवी वीज बिल आलेल्या प्रत्येक ग्राहकाच्या घरी महावितरणने प्रत्यक्ष मौका चौकशी करावी, संबंधित मीटर, रीडिंग, बिलिंग पद्धत, अंदाजे आकारणी आणि चुकीची देयके यांची तपासणी करून तत्काळ सुधारित कार्यवाही करावी. विशेषतः, स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर दबाव आणणे, जुने मीटर असताना रीडिंग न घेता मनमानी अंदाजे बिले देणे, तक्रारींना प्रतिसाद न देणे आणि गरीब-शेतकरी-वृद्ध नागरिकांना आर्थिक कोंडीत ढकलणे हा प्रकार तात्काळ थांबवावा, अशी  मागणी करण्यात आली.

आंदोलन जवळपास दोन तासांहून अधिक काळ सुरू होते. आंदोलनाच्या दरम्यान घोषणाबाजी, निवेदन सादरीकरण, पीडित ग्राहकांची मांडणी आणि अधिकाऱ्यांना थेट प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अधीक्षक अभियंत्यांना आंदोलकांनी चांगलाच घाम फोडला. यावेळी अधीक्षक अभियंत्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांना  निवेदन पाठविण्यात आले, ज्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील वीज ग्राहकांवर होत असलेल्या अन्यायाची सविस्तर माहिती देऊन तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे.

महावितरणने ग्राहकांना सेवा देण्याऐवजी त्यांची आर्थिक लूट, मानसिक छळ आणि प्रशासकीय पिळवणूक सुरू केली आहे. गरीब, शेतकरी, वृद्ध महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या घरात अंधार करून, अवाजवी बिले देऊन आणि तक्रारी दाबून ठेवून महावितरण जर जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल, तर आजाद समाज पार्टी हे मुळीच सहन करणार नाही. गडचिरोलीतील प्रत्येक वीज ग्राहकाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील. असा इशारा राज बन्सोड यांनी दिला आहे.  आगामी काळात हा लढा अधिक व्यापक, तीव्र आणि जिल्हाभर  उभा करण्यात येईल. असेही ते म्हणाले.

आंदोलनात आजाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव अमोल मारकवार, आसपा जिल्हा प्रवक्ते प्रितेश अंबादे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत सातार, युवा अध्यक्ष विकी खोब्रागडे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, आरमोरी युवा अध्यक्ष लकी पाटील, वडसा युवा अध्यक्ष मंगेश बन्सोड, सुरेंद्र वासनिक, चामोर्शी युवा अध्यक्ष प्रतिक खोब्रागडे, महिला अध्यक्ष सोनाशी लभाने, धनराज दामले, नितेश वेस्कडे, सतीश दुर्गमवार, शोभा खोब्रागडे, सविता बांबोळे, भारत मेश्राम आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावांतील वीज ग्राहक, महिला, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!