लोकसभेचा दावा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न:अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आदिवासी समाजाला भाजपाशी जोडण्यासाठी राज्यभर केले जनसंपर्क अभियान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला कार्याचा सविस्तर अहवाल, २४ जिल्ह्यांचा दौरा, ५ हजार कार्यकर्त्यांशी संवाद, ५७९० किमी प्रवास
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१२ जून
भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी महाराष्ट्रातील आदिवासीबहुल भागांमध्ये व्यापक जनसंपर्क अभियान राबवत संघटन विस्तारावर विशेष भर दिला. याचा अहवाल मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आला. अहवाल पुस्तीकेमध्ये राज्यातील २४ जिल्ह्यांचा दौरा, सुमारे ५ हजारांहून अधिक कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद, ५,७९० किलोमीटरचा प्रवास तसेच विविध जिल्ह्यांतील संघटनात्मक बैठका व मार्गदर्शन कार्यक्रमांचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. हा अहवाल सादर करतानाच त्यांनी २०२९ च्या गडचिरोली – चिमूर लोकसभेवरचा आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी महाराष्ट्रातील आदिवासीबहुल भागांमध्ये व्यापक जनसंपर्क अभियान राबवत संघटन विस्तारावर विशेष भर दिला. अहवालानुसार, राज्यातील आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी जिल्हानिहाय बैठका घेण्यात आल्या. या बैठकींमध्ये आदिवासींना भेडसावणाऱ्या शिक्षण, रोजगार, वनहक्क, पायाभूत सुविधा, आरोग्य, सामाजिक विकास तसेच शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीशी संबंधित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी अल्पावधीत केलेल्या व्यापक संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांचे अभिनंदनही केले.
उल्लेखनीय आहे की डॉ. देवराव होळी यांचा २०२४ च्या निवडणुकीत पक्षाने पत्ता कट केला होता. यासाठी त्यांची बोलण्याची भाषा व कार्यप्रणाली कारणीभूत ठरली होती. त्यावेळी त्यांनी पक्ष सोडू नये म्हणून प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली गेली. दरम्यान वर्ष दीड वर्षाच्या कालावधीत त्यांनी स्वतःसह कार्यप्रणाली मध्ये व्यापक बदल केले. आणि स्वतःला भाजपच्या ढाच्यात फिट करुन घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. परिणामी त्यांना अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नवे दायीत्व मिळाले. या संधीचे सोने करण्यासाठी त्यांनी अल्पावधीत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. आणि पक्षसंघटनेला त्यांच्या नव्या कार्यप्रणालीची चुणूक दाखवत लोकसभेच्या २०२९ च्या निवडणुकीतील उमेदवारीवर भक्कमपणे आपला दावा मजबूत केला आहे.
२०२४ मध्ये अशोक नेते हे पराभूत झाले. त्यानंतरही त्यांनी लोकसभेतील आपला जनसंपर्क कायम ठेवला आहे. परंतु पक्षाच्या अंतर्गत गोटात नेते यांना मोठा विरोध आहे. डॉ. होळी प्रमाणे नेतेंकडेही अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय स्तरावरील मोठे पद आहे. परंतु ते या पदाला न्याय देण्यासाठी कधीही पूढे आल्याचे दिसले नाही.
भाजप २०२९ च्या लोकसभेसाठी भाजपमधील विद्यमान नेत्यांची नावे सोडून नव्या नावांचा विचार करीत असल्याचे दिसून आले. रा. स्व. संघाचे विभाग प्रचारक व त्यांचे वरिष्ठ प्रचारक आणि परिवारातील संघटनांचे राज्य आणि राष्ट्रीय संघटनमंत्री हे या कामी लागलेले दिसून आले. नुकतेच वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय संघटनमंत्री योगेश बापट हे गडचिरोलीत येऊन गेले. त्यांनी काही कार्यकर्त्यांजवळ या विषयावर चर्चा केल्याची माहिती आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ.होळी यांच्या प्रयत्नाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. एकूणच काय, भाजपमध्ये २०२९ च्या लोकसभेची तयारी सुरू झाली आहे.



