नवनिर्माण सोबतच जुन्या जाणत्या अनुभवी कार्यकर्त्यांची मोट बांधणारे अभियान म्हणजे संघटन सृजन अभियान
- आमदार मनीष यादव
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १५ एप्रिल
जबाबदारी स्वीकारून अधिक जोमाने, पारदर्शकपणे कोणताही भेदभाव न ठेवता कांग्रेस ची विचारधारा जनते पर्यंत पोहोचवणारे तरुण नेतृत्व कांग्रेस मध्ये सक्रिय करण्यासाठी हे नवनिर्माण अभियान देशभरात राबविण्यात येत असल्याचे राजस्थानचे आमदार आणि अभियानाचे संपर्क प्रमुख मनीष यादव यांनी सांगितले. ते संघटन सृजन अभियानाचे निमित्ताने गडचिरोलीत पाच दिवसांच्या मुक्कामाने आले असताना पहील्या दिवशी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करीत होते.
यावेळी मंचावर ज्येष्ठ नेते माजी खासदार मारोतराव कोवासे, अमरावतीचे माजी मंत्री सुनील देशमुख, आरमोरीचे आमदार रामदास मसराम, नागपूर ग्रामीण चे आमदार संजय मेश्राम, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी अध्यक्ष प्रकाश इटनकर, महासचिव रवींद्र दरेकर, सचिव विश्वजीत कोवासे, महिला सचिव कुसूम आलाम, सचिव पंकज गुड्डेवार, माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

श्री यादव पुढे म्हणाले की कांग्रेस ही एक विचारधारा आहे. मागिल काही वर्षांपासून तिला काहीशी उतरती कळा लागली आहे. त्यामुळे संघटन सृजन अभियानातून नवीन युवा कार्यकर्ते जोडणे, जे जळलेले आहेत मात्र त्यांना संधी मिळाली नाही अशांना संधी उपलब्ध करून देणे अशा प्रकारचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभियानात साधारण पणे प्रत्येक विभागात जाऊन तेथील स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांची मतं ऐकून घेणे आणि त्या अहवालाच्या आधारावर नवीन जिल्हाध्यक्ष व त्यांच्या टीमची केंद्रीय कांग्रेस कमिटी मार्फत नियुक्ती करणे असा हेतू आहे.
एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की जुन्या, जाणत्या, अनुभवी कार्यकर्ते आणि नेते यांना सोबत घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन तरुण कार्यकर्त्यांना समन्वयातून संघटन बळकटीकडे वाटचाल केली जाईल. पक्ष संघटनेला नव्या जुन्या सर्वांची गरज आहे.
पत्रकार परिषदेनंतर जिल्हा पदाधिकाऱ्यांची अभियान विषयावर प्रदीर्घ बैठक संपन्न झाली. यात जिल्हा स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मतं वैयक्तिक रीत्या जाणून घेतली. हे अभियान गडचिरोली जिल्ह्यात पुढील पाच दिवस सुरू राहणार आहे. अभियानाचे प्रास्ताविक सुनील देशमुख यांनी केले.



