उद्योगांसाठी अनावश्यक सुपीक जमिनी अधिग्रहित करु नका, अन्यथा जनसंघर्षाला सामोरे जा!
विजय वडेट्टीवार यांचा इशारा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ३१ मार्च
गडचिरोली जिल्ह्यात नव्याने येऊ घातलेल्या उद्योगांसाठी अनावश्यक सुपीक जमिनी अधिग्रहित करुन त्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा सरकारचा प्रयत्न कांग्रेसच्या नेतृत्वात येथील शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी लवकरच कांग्रेस पक्ष रस्त्यावर उतरुन मोठे आंदोलन करील असा इशारा कांग्रेसचे विधानसभा पक्ष नेते तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी गडचिरोलीत आयोजित एका पत्रकार परिषदेतून दिला आहे.
उल्लेखनीय आहे की गडचिरोलीत उद्योगांसाठी सुपीक जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. या पार्श्वभूमीवर श्री वडेट्टीवार यांनी सांगितले की जमिनी देण्यासाठी शेतकऱ्यांवर बळजबरी करू नका, यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या भेंडाळा परिसरातील १४ गावांमधील नागरिकांना घेऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली.
गडचिरोली जिल्ह्यात उद्योगांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावण्याचे षडयंत्र सुरू असून, या प्रक्रियेत सत्ताधारी भाजपशी संबंधित नेत्यांची भागीदारी असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. ते म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याचा ७० टक्के भूभाग जंगलाने व्यापलेला आहे. केवळ ३० टक्के जमीन शेती आणि वस्ती आणि इतर कामांसाठी उपलब्ध असताना, आता चामोर्शी तालुक्यातील १४ गावांमधील सुपीक जमीन अधिग्रहित केली जात आहे. आगामी काळात आणखी ३३ गावे या प्रक्रियेत येणार असल्याने ही गावे ओसाड पडण्याची आणि हजारो शेतकरी भूमिहीन होऊ शकतात. या मुद्द्यावर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी ३३ गावांची जमीन घेण्यासंदर्भात कोणताही निर्णय किंवा प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे स्पष्ट केले.
यावेळी आ.वडेट्टीवार म्हणाले, उद्योगांना आमचा विरोध नाही, उद्योग यावे, विकास व्हावा, पण त्यासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमिन न घेता पडीक जमिनीवर उद्योग उभारावेत. जिल्ह्यात उद्योग येतो म्हणजे रोजगार निर्मिती होते या दाव्याची हवा वडेट्टीवार यांनी काढली. एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांना प्रति एकर केवळ ५ ते ८.५ लाख रुपये दिले जात आहेत, जो अत्यंत कमी मोबदला असल्याचे ते म्हणाले. आदिवासींच्या जमिनी भाडेतत्त्वावर घेऊन त्यांच्या मूळ संस्कृतीला धक्का लावण्याचे काम सुरू आहे, असाही आरोप वडेट्टीवार यांनी केला. गडचिरोली जिल्ह्याला खनिज निधीतून मिळणारा ४०० ते ४५० कोटींचा महसूल जातो कुठे? तो जनतेच्या कल्याणासाठी वापरला जातो का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सुधीर मुनगंटीवार विरोधी पक्षांचे कंत्राटी नेते
सध्या मुल – बल्लारपूर विधानसभेचे आमदार आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत विरोधी पक्ष नेत्यांच्या भूमिकेत सरकारवर कडक टीका करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार हे विरोधी पक्षांना सहकार्य करीत आहेत की काय? या प्रश्नावर वडेट्टीवार म्हणाले की सुधीरभाऊ हे सध्या विरोधी पक्षांचे कंत्राटी नेते आहेत. जोपर्यंत त्यांचे मंत्री म्हणून पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत त्यांना आम्ही सोडणार नाही.
या पत्रकार परिषदेला आ.रामदास मसराम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजीत कोवासे, ॲड.राम मेश्राम, मनोहर पाटील पोरेटी, वसंत राऊत व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



