लग्नाच्या वरातीतील स्कॉर्पिओचा भीषण अपघात; ५ ठार, ७ जखमी
गडचिरोली-चामोर्शी मार्गावर ट्रॅव्हल्सशी धडक; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २९ मार्च
लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाचा भीषण अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील कुरुड-कढोली गावादरम्यान नाल्याजवळ घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ वाहनात एकूण १६ प्रवासी प्रवास करत होते. ही गाडी रामपूर येथून लग्न सोहळा आटोपून भाडबिडी मोकासा येथे जात होती. दरम्यान, गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणाऱ्या त्रिवेणी अर्थमुवर्सच्या प्रवासी ट्रॅव्हल्सशी स्कॉर्पिओची जोरदार धडक झाली. धडकेत स्कॉर्पिओ वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघातानंतर जखमींना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारासाठी नेत असताना वाटेतच दोघांचा मृत्यू झाला. सध्या उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.



