लाहेरी पोलिसांनी आवळल्या भुताच्या मुसक्या!
गावकरी व नातेवाईकांमध्ये कल्पनाला भुताने मारल्याची होती चर्चा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२१ मे
मृतकाच्या पतीच्या पहिल्या पत्नीने कल्पनाच्या अंगात येऊन तिला फाशी लाऊन घेण्यासाठी प्रवृत्त केले असल्याची माहिती नातेवाईक व लोकांनी पोलिसांना दिली असताना अतिदुर्गम भागातील लाहेरी पोलिसांनी मात्र या अंधश्रद्धेला बळी न पडता आपला तपास कायम ठेवत वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून साक्षीदारांना तपासून, वैज्ञानिक दृष्टीने तपास करीत तब्बल एक महिन्यानंतर हत्येच्या आरोपीला बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे. गुड्डू गावडे असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी १९ मे रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गड्डूला सोमवारी पून्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
एक महिन्यापूर्वी भामरागड तालुक्यातील मलमपोड्डूर या गावात शेतामध्ये कल्पना विलास कोठारे या महिलेने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्याबाबत कल्पना हिने स्वतःच्या आजाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याबाबत तिचे पती विलास कोठारे यांनी लाहेरी पोलीसांना सांगितले होते. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला होता. कल्पनाची आत्महत्या नसून कुणीतरी गळा दाबून तिचा खून केल्याचा संशय आल्याने पोलिसांनी लाहेरी पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ०२/२०२३ भादंवी कलम ३०२,२०१ अन्वये गुन्हा नोंद केला होता. परंतु काही एक पुरावा मिळत नसल्याने पोलीस संभ्रमात होते. सदरची घटना शेतामध्ये झाल्याने कोणीही प्रत्यक्षदर्शी अथवा कुठलेही पुरावे पोलिसांना मिळत नव्हते.
पोलिसांना चौकशी दरम्यान कल्पनाची हत्या विलास कोठारे यांची पहिली पत्नी हिने कल्पना हिच्या अंगात येऊन फाशी लाऊन घेतली असल्याची माहिती नातेवाईक व लोकांनी दिली. आणि सदर प्रकाराबाबत कुठल्याही माणसावर संशय नसल्याचे सांगितल्याने पोलीसांची सुद्धा तारांबळ उडाली होती. परंतु पोलिसांनी आपला तपास कायम ठेवत वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून साक्षीदारांना तपासून, वैज्ञानिक दृष्टीने तपासून तब्बल एक महिन्यानंतर आरोपी गुड्डू गावडे यास ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच त्याने सदर हत्या केल्याचे कबूल केल्यानंतर त्याला अटक केली. अधिक चौकशीमध्ये पोलिसांना समजले की मृतक महिला कल्पना कोठारे यांचे मोजा मलमपोड्डूर येथे पोल्ट्री फार्म व राईस मिल होते त्यावर कल्पना हिच्या दिराचा साळा गुड्डू मागील तीन वर्षापासून तिथेच कामाला व रहावयास होता. कल्पना गुड्डूला काम नीट करण्याकरिता वेळोवेळी रागवायची. तसेच गुड्डू हिच्या बहिणी सुद्धा घर कामावरून कधी कधी रागवायच्या. तसेच गुड्डूच्या एकतर्फी प्रेमा बाबत कल्पनाला माहिती असल्याने, तोच राग मनात धरून गुड्डूने मध्यरात्री कल्पना हिच्यावर पाळत ठेवून ती रात्री वाशरूमसाठी उठल्याने पाठीमागून जाऊन तिचा गळा दाबून हत्या केली. आणि संशय येऊ नये म्हणून दोरीच्या साह्याने झाडाला लटकवून आत्महत्या असल्याचे भासवले. मात्र पोलिसांनी अखेर गुड्डू नामक भुताच्या मुसक्या आवळल्या. सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष काजळे, महादेव भालेराव यांनी केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन सरकटे करीत आहेत.