आपला जिल्हाविशेष वृतान्त

‘कर्मचाऱ्यांनो’ आपल्या क्षेत्रात काम करताना जय सेवा म्हणा आणि जनतेला विचारा की मी आपणास काय सेवा देऊ

अहेरीच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिले लोकाभिमुख प्रशासनाचे धडे

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १५ डिसेंबर 

गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त असून या भागात सर्व शासकीय विभागांमार्फत अनेक शासकीय योजना राबविण्यात येतात तथापि, या योजनांची परिपूर्ण माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नसल्याने त्यांना लाभापासून वंचित रहावे लागते. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयात पोहोचताच लोकांना ‘जय सेवा’ असा नमस्कार करून मी आपणास काय सेवा देऊ शकतो असे विचारा आणि कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्या समस्यांचे निराकरण करा. आणि लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करा. असे आवाहन अहेरीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी केले. ते मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात बोलत होते.

अहेरी भागातील आदिवासी बहुल तालुक्यातील काही दुर्गम गावांमध्ये भेटी देऊन शासनामार्फत विविध विभागांच्या राबविण्यात येत असलेल्या योजनांच्या अंमलबजावणी बाबत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता, राबविण्यात येत असलेल्या योजनांची परिपूर्ण माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत पूर्णतः पोहचत नसल्याची बाब निदर्शनास आली. हे लक्षात घेऊन त्यांनी कर्मचाऱ्यांना सदर आवाहन केले आहे.

वॅली ब्रिजच्या कामाची पाहणी करताना अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे

दरम्यान त्यांनी भामरागड तालुक्यातील लाहेरी, मलापोडूर, गोपनार या अतिदुर्गम गावांना भेटी देऊन तेथील अडीअडचणी जाणून घेतल्या. लाहेरी जवळ निर्माणाधीन वॅली ब्रिजच्या कामाची पाहणी केली. या पुलामुळे या भागातील पाच गावांचा जमीनी संपर्क सुरळीत होऊन नागरिकांना तालुक्याला आवागमनाची सुविधा उपलब्ध होईल. पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

कोणत्याही क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, शासकीय योजनांमध्ये सक्रिय जनसहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी सर्व शासकीय विभागांच्या योजनांची एकत्रित माहिती पुस्तिका सर्वसामान्य जनतेपर्यंत, प्रत्येक गाव, ग्रामपंचायत, गोटुल स्तरावर उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. भामरागड, एटापल्ली या तालुक्यात आदिवासी बांधवांची ( माडिया व गोंड) ८० टक्केच्या वर लोकसंख्या आहे. भामरागड, एटापल्ली, अहेरी आणि सिरोंचा या तालुक्यातील बरीच गावे अतिशय दुर्गम आहेत. अशा दुर्गम गावातील वैयक्तिक व सामूहिक स्वरूपाच्या समस्या निराकरणासाठी तक्रार नेमकी कोणाकडे करायची ही माहिती सुद्धा व्यवस्थित उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्याने उद्भवलेल्या समस्यांच्या निराकरणासाठी तक्रार, संपर्क कोणाकडे करायचा याबाबत माहिती फलक तयार करून गावात दर्शनी भागी लावण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!