गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेटमध्ये गाजला प्राध्यापक भरतीचा मुद्दा
गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेटची सभा स्थगित
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१० नोव्हेंबर
गुरुवार नऊ नोव्हेंबर रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेटच्या सभेत गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या गोंडवाना विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक पदभरती संदर्भातील मुद्दा गाजला. या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सिनेट सदस्यांनी चौकशी समितीची मागणी केली. वेळेत चर्चा पूर्ण होऊ न शकल्याने सिनेट स्थगित करण्यात आली. दिवाळी नंतर स्थगित सभा घेण्यात येणार असल्याचे सांगितले गेले.
गुरुवारी सिनेटची सभा सुरू झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्याबरोबर सिनेटर प्राध्यापक दिलीप चौधरी यांनी प्राध्यापक पद भरती संदर्भातला प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाली. प्राध्यापक चौधरी यांनी जाहिराती पासून तर एकूणच पदभरतीची प्रक्रिया कशी चुकीच्या पद्धतीने राबविल्या गेली व त्यामध्ये प्रशासनाने जाणीवपूर्वक आरक्षणापासून अनेक विषय गांभीर्याने न घेता पदभरती पारदर्शक पद्धतीने राबविली नाही. त्यामुळे विद्यापीठाची बदनामी तर झालीच शिवाय पदभरती वेळेवर होऊ न शकल्यामुळे टीचर्स स्टुडन्ट रेशो कमी होऊन नॅक मध्ये विद्यापीठाला कमी ग्रेड मिळाली. ही पदभरती वेळेवर झाली असती तर नॅक मूल्यांकनात देखील विद्यापीठाची ग्रेड वाढू शकली असती. याला कोण जबाबदार आहे? या पदभरती मध्ये विद्यापीठाची बदनामी झाली त्याची जबाबदारी कोणाची ? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत प्रा. दिलीप चौधरी यांनी पदभरती प्रक्रियेवर ताशेरे ओढले.
आमदाराच्या मागणीला कुलगुरूंचे ऊडवाऊडवीचे ऊत्तरपदभरतीचा मुद्दा विधीमंडळात मांडण्याचा इशारा
सिनेटचे सदस्य तथा राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांचा देखील याच विषयावर प्रश्न असल्यामुळे त्यांनी त्यांचाही प्रश्न या चर्चेत समाविष्ट करण्याची मागणी केली आणि महिला आरक्षणावरून व एकूणच आरक्षणाचे धोरण चुकीच्या पद्धतीने राबविला गेले त्यामुळे महिलांना विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापक पदभरती संधी मिळाली नाही म्हणून विद्यापीठाच्या पदभरती प्रक्रियेवर ताशेरे ओढले. कुलगुरू या ठिकाणी समाधानकारक उत्तर देत नसल्यामुळे हा मुद्दा विधानसभेत देखील उचलल्या जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
कुलगुरू व प्रशासनाच्या माध्यमातून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे पाहून सभागृहातील इतर सिनेट सदस्य डॉ. मिलिंद भगत, निलेश बेलखेडे, शिवानी वडेट्टीवार, डॉ. प्रवीण जोगी, अजय लोंढे, दीपक धोपटे, डॉ.सतीश कन्नाके, डॉ. विवेक शिंदे, डॉ. संभाजी वरकड, प्रा. शिल्पा नरवाडे, स्वप्नील दोंतुलवार यांनी अनेक मुद्द्यांवर विद्यापीठ प्रशासनाला चांगलेच जेरीस आणले. विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक पदभरती महिलांच्या आरक्षण तसेच खेळाडूंच्या आरक्षण पाळले गेले नाही, निवड झालेल्या उमेदवारांना चुकीच्या पद्धतीने रुजू करून घेतले जाहिरातीत दिलेल्या मुलाखतीच्या स्वरूपानुसार मुलाखती झालेल्या नाहीत प्रेझेंटेशन विद्यार्थ्यांचे घेतलेले नाहीत त्यामुळे या संपूर्ण पदभरती प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी कुलगुरूंनी सिनेट सदस्यांची एक चौकशी समिती स्थापन करावी. असा लेखी अर्ज सिनेट सदस्यांनी दिला. शेवटी कुलगुरू कुणाचेही एकूण घेत नाही. असे जाणवताच आमदार सुभाष धोटे यांनी वॉकआउट केले. त्याचवेळी सायंकाळी पाच वाजले असल्यामुळे इतर सदस्यांनी देखील सिनेटची चर्चा इथेच थांबवून ही सिनेट तात्पुरती स्थगित करावी व दिवाळीनंतर सिनेटची सभा घ्यावी असा पवित्रा घेतल्यामुळे सिनेटची सभा स्थगित करण्यात आली.