शासकिय आश्रमशाळेतील १०५ विद्यार्थ्यांनींना जेवणातून विषबाधा
१५ विद्यार्थीनी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २० डिसेंबर
जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील १०५ विद्यार्थ्यांनींना भोजनातून विषबाधा झाली असून त्या सर्वांना धानोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील १५ ते २० मुलींना प्राथमिक उपचारानंतर सुटी दिली तर १५ विद्यार्थ्यांनींची प्रकृती गंभीर असल्यामुळे गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनींवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून आदिवासी विकास प्रकल्पांमधील आश्रमशाळेतील व्यवस्थापनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार सोडे येथील मुलींच्या आश्रमशाळेतील विद्यार्थीनींनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आलुगोभीची भाजी, वरण आणि भात असे जेवण केल्यानंतर काही वेळाने मुलींना उलट्या आणि हागवण सुरू झाली. तेव्हा तेथील शिक्षकांनी दुपारी तीन वाजताच्या सुमारास सहा ते सात मुलींना धानोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांचेवर प्राथमिक उपचार सुरू असतानाच आणखी मुलींना मळमळ, उलट्या आणि हागवण सुरू झाली. त्यांना सुद्धा रुग्णालयात हलवणे सुरू झाले सायंकाळपर्यंत १०५ मुलींना विषबाधा झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जवळजवळ १५ मुलींना उपचारानंतर सुटी देण्यात आली असून ७५ विद्यार्थ्यांनींवर उपचार सुरू आहेत. तर १५ विद्यार्थिनींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सध्या सर्व विद्यार्थीनींची तब्येत धोक्याबाहेर असली तरी मुली अतिशय घाबरलेल्या असल्यामुळे त्यांना गंभीर म्हणून जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. दरम्यान गडचिरोलीचे सिव्हिल सर्जन डॉ. खंडाते आपल्या वैद्यकीय चमूसह परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गडचिरोलीचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राहुल मीना हे स्वतः रुग्णालयात उपस्थित राहून आढावा घेत आहेत.
दरम्यान शाळेतील भोजनाचे कंत्राट देण्यात आले असले तरी शाळेतील कर्मचारीच स्वयंपाकाचे काम करीत असल्याचे समजते. या संदर्भात मुख्याध्यापक मंडलवार यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचेशी संपर्क होऊ शकला नाही.