आपला जिल्हाराजकीयविशेष वृतान्त

विकास कामात विफल ठरलेल्या आमदारांकडून अंधश्रद्धेला खतपाणी ; मार्कंडेश्वर मंदिराच्या अपूर्ण कामासाठी आमदार होळींचे महामृत्युंजय मार्कंडेश्वराचे जागरण अनुष्ठान!

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१३ मे

कोणत्याही विकास कामाच्या पूर्ततेसाठी लोकप्रतिनिधींकडून संबंधित विभाग, राज्य सरकार, केंद्र सरकार, संबंधित खात्याचे मंत्री, प्रशासनिक अधिकारी अशा विभागांशी संपर्क करून लोकप्रतिनिधी म्हणून प्रसंगी त्यांच्यावर दबाव आणून कायदेशीर मार्गाचा वापर करून विधिमंडळात त्यांना प्राप्त आयुधांचा उपयोग करून अशी विकास काम पूर्णत्वास नेण्याची व्यवस्था असताना गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी हे करण्याचे सोडून महादेवाच्या जागरणाचा आणि अनुष्ठानाचा कार्यक्रम आयोजित केल्याने, जिल्हाभरातील राजकीय सामाजिक आणि सामान्य नागरिकांच्या भुवया उंचावल्या जात आहेत. अनेकांनी आमदारांच्या या कृतीला अंधश्रद्धेचा बोलबाला आणि २०२४ च्या निवडणुकीसाठी श्रद्धेचा आधार घेऊन मतांसाठी मार्केटिंग करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थानाचे दुरुस्तीचे काम २०१५ पासून सुरू झालेले असताना, कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असताना सुद्धा सात वर्षांपेक्षा अधिक काळ लोटूनही सदर काम अद्याप पूर्ण झालेले नसल्यामुळे गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ देवराव होळी यांनी ५ ते १५ में पर्यंत महामृत्युंजय मार्कंडेश्वराचे जागरण अनुष्ठान सुरु केले आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना आ. डॉ. होळी

शनिवारी त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी परिसरातील समस्त श्रद्धळूंना समारोपीय जलाभिषेकासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ५ मे पासून कार्तिक स्वामी धाम हरणघाट येथील मुरलीधर महाराज यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये दिवस रात्र भगवान महादेवाचे जागरण अनुष्ठान सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भगवान मार्कंडेय महादेव यांना जागृत केल्याशिवाय मार्कंडेश्वर मंदिराचे काम पूर्ण होणार नाही असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

पत्रकारांच्या प्रश्नाला यावेळी उत्तर देताना ते म्हणाले की सर्व प्रकारचे प्रयत्न केल्यानंतरही मंदिराच्या जीर्णोद्धाराचे किंवा अर्धवट राहिलेले काम पूर्णत्वास जात नाही, ही मार्कंडेश्वराचीच अवकृपा असू शकते. हा श्रद्धेचा विषय आहे. म्हणून जलाभिषेक आणि जागरण अनुष्ठान करण्यात येत आहे. राम मंदिराचा मुद्दा भारतीय जनता पार्टीने उचलला नसता तर राम मंदिर आज पूर्णत्वास येण्याचा योगही आला नसता असेही ते यावे म्हणाले. आपण यातून अंधश्रद्धेला खतपाणी घालून मतांची पोळी शेकण्याचा प्रयत्न करीत आहात? या प्रश्नावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

विकास कामात अपयशी आमदाराचा अंधश्रद्धेतून जनतेला फसवण्याचा प्रयत्न
मागील नऊ वर्षांपासून डॉ.होळी हे गडचिरोली विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. या दरम्यान ते विकास करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. अशा वेळी ते केलेली विकासकामे दाखवू शकत नाहीत. म्हणून मार्कंडेश्वराला शरण जाऊन जागरण अनुष्ठान करुन जनतेची दिशाभूल करत अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करीत आहेत. ते महामृत्युंजय महादेव आहेत. आमदार डॉ होळींची मार्केटिंग कधीच सफल होऊ देणार नाहीत.
महेंद्र ब्राह्मणवाडे, अध्यक्ष गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!