चामोर्शीच्या ठाणेदाराकडून कडून बाजार समितीच्या माजी सभापतीला बेदम मारहाण
आयसीयुत भरती, जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे तक्रार, सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि. २० एप्रिल
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील ठाणेदार राजेश खांडवे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना पहाटे पावणेपाच वाजताचे सुमारास पोलिस स्टेशनमध्ये फोन करून बोलावून ठाण्यातील त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना बाहेर काढून अश्लील शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी व जोड्याने बेदम मारहाण केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीत गण्यारपवार यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला फ्रक्चर झाले असून पाठीवर, मानेवर आणि खांद्यावर मोठा मार बसलेला आहे. ते सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
या संदर्भात गण्यारपवार यांचे लहान बंधू अमोल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देऊन पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांचे वर बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
गण्यारपवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की ठाणेदार खांडवे यांनी अतुल गण्यारपवार यांना पहाटे साडेचार ते पावणे पाचच्या सुमानास भ्रमणध्वनीवरून कॉल करून पोलीस स्टेशन मध्ये बोलावले. न आल्यास पाहून घेण्याची धमकी दिली त्यामुळे ते घरून पोलीस स्टेशनमध्ये गेले असता ते आत येताच ठाणेदार खांडवे यांनी त्यांना एका कक्षात घेऊन गेले व अधिनस्त कर्मचाऱ्याला पट्टा आणायला सांगून आई बहिणीवरून अश्लील शिवीगाळ सुरू करत मारहाण केली. अतुल यांनी आपला काय गुन्हा आहे आपण का मारहाण करता असे विचारणा केली असता मी तुझे राजकारण संपवून टाकीन. माझे कुणीही काहीही वाकडे करू शकत नाही. माझे सासरे आमदार आहेत. वडील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते. माझी नोकरी गेली तरी चालेल. पण मी तुझे राजकारण संपवल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणत तुझा आणि तुझ्या भावाचा एन्काऊंटर करून टाकीन असे म्हणत बेदम मारहाण केली.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात चौकशी सुरू केली असून गण्यारपवार यांचे बयान नोंदवले आहे. तर ठाणेदार खांडवे यांनाही चौकशी साठी गडचिरोली येथे पाचारण केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दुसरीकडे चामोर्शी पोलिसांच्या इश्तेगाशा नुसार गण्यारपवार हे आपल्या इतर नऊ सहकाऱ्यांसह पोलीस रात्रगस्त करीत असताना पहाटे साडेतीन ते चार वाजता च्या दरम्यान आष्टी मार्गावर दिसून आले त्यांना थांबवून विचारणा केली असता त्यांनी उत्तर देऊन आरडा ओरडा सुरू केला व शांतता भंग केली अशी नोंद केलेली आहे. परंतु त्यांचेवर कोणताही गुन्हा नोंद केला नाही. दरम्यान ठाणेदार खांडवे यांनी मारहाण केल्याचा इन्कार केला आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे चौकशी,
सर्व बाबी तपासून कारवाई करणारया प्रकरणाची चौकशी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे कडे सोपवली आहे. त्यांनी तात्काळ चौकशी सुरू केली असून पोलीस स्टेशन मधील फुटेज ताब्यात घेतले आहेत. पिडीतासह आणखी एका व्यक्तीचे बयान नोंदवले असुन याप्रकरणी गंभीरपणे चौकशी करण्यात येईल आणि चौकशी अंती कायदेशीर कारवाई केली जाईल.
नीलोत्पल, जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली