नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेली स्फोटके व इतर साहित्य शोधून काढण्यात पोलीसांना यश
कुरखेडा पोलीस उपविभाअंतर्गत हेटळकसा जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक, १९२ सीआरपीएफ बटालियनचे यंग प्लॉटून व बॉम्ब शोधक पथकाचे संयुक्त नक्षलविरोधी अभियान

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०५ ऑगस्ट
मौजा हेटळकसा जंगल परिसरामध्ये नक्षलविरोधी अभियान राबवत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका संशयित ठिकाणी लपवून ठेवलेले स्फोटके व इतर साहित्य शोधून काढण्यात जवानांना यश आले आहे. विशेष अभियान पथक गडचिरोली, ‘सीआरपीएफ’ १९२ बटालियनचे ‘यंग प्लॉटून’चे जवान व बी.डी.डी.एस. पथकाच्या जवानांनी ही कामगिरी केली. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारावाई केल्यामुळे नक्षलींना मोठा हादरा बसल्याचे बोलले जात आहे.
नक्षलवाद्यांकडून २८ जुलै ते ३ ऑगस्ट या दरम्यान नक्षल सप्ताह पाळण्यात येतो. सप्ताहादरम्यान अनेक हिंसक कारवाया तसेच सुरक्षा दलांना धोका होऊ शकेल अशा इतर ठिकाणी स्फोटके, शस्त्र साहित्य व दारूगोळा इत्यादी ते गोपनीयरित्या जमिनीत पुरून ठेवला जातो. ४ जुलै रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमकें कोटगुल हद्दीमध्ये मौजा हेटळकसा जंगल परिसरात कोरची एलओएस, टिपागड एलओएस व कंपनी क्र. ४ च्या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली नक्षलविरोधी अभियान राबवण्यात आले.
सदर डंप हे पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या मोठ्या टाकीमध्ये लपवून पुरून ठेवण्यात आले होते. यात २ कुकरपैकी स्फोटकांनी भरलेला एक कुकर, ४ कार रिमोट, ३ वायर बंडल, ८ पॉकेट डिस्ट कलर, पिवळ्या रंगाची पावड, राखाडी रंगाची पावडर, ५० किलो पांढरी पावडर, ०२ नक्षलवादी पुस्तके, ०१ प्लास्टिक पाण्याची टाकी इत्यादी साहित्य जप्त करण्यात आला. स्फोटकांनी भरलेला कुकर घटनास्थळीच नष्ट करण्यात आला व इतर साहित्य गडचिरोली येथे आणण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.