विशेष वृतान्त

जपतलाई येथील आश्रमशाळेतील तीन विद्यार्थीनींचा सर्पदंशाने मृत्यू; एक अत्यवस्थ तर एकीची तब्येत धोक्याबाहेर

१४ विद्यार्थी निरीक्षणाखाली जिल्हा सामान्य रुग्णालयात

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १० ऑगस्ट 

जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेतील तीन विद्यार्थीनींचा रात्री १.३० ते २.०० वाजताच्या सुमारास विषारी साप चालल्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. यात आणखी दोन विद्यार्थीनी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्या आहेत. यापैकी एक दीपीका मडावी हीची प्रकृती अत्यवस्थ आहे तर एक धोक्याच्या बाहेर आहे. तर १४ विद्यार्थी निरीक्षणा खाली गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात आहेत. 

माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोली द्वारा संचालित अनुदानित प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा, जपतलाई येथे रात्रीच्या १.३० ते दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, रात्री सुमारे दोन वाजताच्या सुमारास वसतिगृहातील खोलीत साप शिरला. त्यावेळी सुमारे ७९ विद्यार्थिनी जमिनीवर गाद्या टाकून झोपलेल्या होत्या. याच दरम्यान काही विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे.

घटनेनंतर सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींना तातडीने धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान धानोरा येथे दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर एका विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेत एकूण तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. सुष्मिता सरोजिनी मंडल, दीपीका इतवा लकडा व अनु गजूराम पोरेटी अशी मृतक विद्यार्थीनींची नावं आहेत.

दरम्यान, दीपिका बिटकुरसाय मडावी, इयत्ता पाचवी, हिची प्रकृती अत्यवस्थ असून, आणखी दोन विद्यार्थिनी गंभीर असल्याची माहिती रुग्णालयाच्या सुत्रांनी दिली आहे. गंभीर आणि अत्यवस्थ विद्यार्थिनींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

तर, इतर १४ विद्यार्थिनींना खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. सर्पदंशाच्या घटनेनंतर इतर विद्यार्थिनीही मोठ्या प्रमाणात घाबरल्या असून, त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाकडून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तर पोलीसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद केला आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच सर्पदंशाची घटना नेमकी कोणत्या परिस्थितीत घडली, याबाबत तपास करण्यात येत आहे.

या घटनेनंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वसतिगृहांची स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, सर्पप्रतिबंधक उपाययोजना तसेच रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांची सर्व आश्रमशाळांमध्ये तपासणी आणि चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि पालकांकडून जोर धरू लागली आहे.

आमी जमीनीवरच गद्या टाकून झोपतून जी 

“घटनेच्या संदर्भात निरीक्षणाखाली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की ते सर्व आश्रमशाळेत एका मोठ्या हॉलमध्ये जमीनीवर गाद्या टाकून एका गादीवर दोघे असे झोपतात. रात्री दोनच्या सुमारास एक मुलगी काहीतरी चावला मनुन बोंबलली. त आमी उठलून त तेथी सरप दिसला. मंग मोठी बोंबाबोंब झाली. मंग शाळेचे सरगिन आले न सर्वाइले दवाखान्यात नेले. आमाले पक्का भेव लागला. न आमचे पोट दुखू लागले.  मंग राती ३/४ वाजता आमाले दवाखान्यात नेले “.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!