विशेष वृतान्त

ओबीसी आमच्या डीएनएत आहे म्हणणारी भाजपच ओबीसींचे सर्वात मोठे मारेकरी – डॉ. यशपाल भिंगे

काँग्रेसच्या ओबीसी विभागाची मंडल यात्रा गडचिरोलीत

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ९ ऑगस्ट 

भाजपने ओबीसींच्या संदर्भात नेहमीच पोकळ आश्वासने दिली. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला, जात निहाय जनगणनेला विरोध केला अशी भाजपा ही जरी ओबीसी आमच्या डीएनएत आहे, असे म्हणत असली तरी तेच ओबीसींचे सर्वात मोठे मारेकरी आहेत अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे यांनी केली.

ते रविवारी काँग्रेसच्या वतीने आयोजित मंडल यात्रेच्या निमित्ताने गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ही मंडल यात्रा ७ ते ११ ऑगस्ट पर्यंत पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात कांग्रेसची ओबीसी संदर्भातील प्रामाणिक भूमिका मांडणार आहे.

श्री भिंगे यांनी सांगितले की मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यात कांग्रेसने देशभर मोठी भूमिका निभावली आहे. परंतू त्याची कधी जाहिरात केली नाही. दुसरीकडे भाजप ओबीसींसाठी बोटभर काम करते आणि हातभर त्याची जाहिरात करुन ओबीसींची दिशाभूल करण्याचे काम करीत आहे. मंडलचा मार्ग हा सामाजिक न्यायाचा मार्ग असून आरक्षण हे आमच्या हक्काचे आहे. त्यासाठी सर्वांगीण लढा देण्यासाठी कांग्रेस कटिबद्ध आहे. यासाठी कांग्रेसने पंचसूत्री संकल्प केला आहे. यात जातीनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षणाचे संरक्षण, शिक्षणात अधिक शिष्यवृत्ती व फेलोशिप, लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व, संविधान आणि सामाजिक न्यायाचे रक्षण यांचा समावेश आहे.
यात्रेच्या दरम्यान मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी पूर्ण करावी,लोकसभेत मंजूर मागणीनुसार जातीनिहाय जनगणनेत ओबीसींकरीता स्वतंत्र कॉलम असावा, महाराष्ट्रातील केंद्रीय ओबीसी यादीत प्रलंबित २७ जातींचा तात्काळ समावेश करावा, राष्ट्रीय ओबीसी आयोगाची २ विभागीय कार्यालये स्थापन करावी आणि केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय सुरू करावे अशा मागण्या केल्या आहेत.
काँग्रेसचा ओबीसी विभाग महाराष्ट्रातील आठ विभागात टप्प्याटप्प्याने मंडल यात्रा काढून ओबीसी जागरण करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ओबीसींच्या विषयांकडे कांग्रेसचे काही काळ दुर्लक्ष झाल्याचे भिंगे यांनी मान्य केले. मात्र यापुढे ओबीसींच्या विषयांवर कांग्रेस सातत्याने आणि प्रामाणिकपणे काम करील. अशीही पुस्ती त्यांनी जोडली.
पत्रकार परिषदेला यात्रेचे संयोजक तथा नागपूर विभाग समन्वयक मोरेश्वर भादे, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष एड. विश्वजीत कोवासे, ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज ढोरे, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, ओबीसी कांग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक अजय हटेवार, महासचिव मंगला कार्लेकर, वीणा कटरे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!