नक्षल सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी तीन नक्षल समर्थकांना अटक
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २८ जुलै
गुरुवार पासून नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरु झाला असून पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे तीन नक्षल समर्थकांना नक्षली बॅनर लावताना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या सप्ताहा दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस विभागाने पर्यायी रणनीती आखली असून नक्षलविरोधी शोध अभियान सुरु केले आहे. नक्षल सप्ताहाचा पहिला दिवस नक्षल समर्थकांना अटक करण्यात गेला असून हा सामान्य नागरिकांसाठी दिलासा देणारा ठरला.
चारू मुजुमदार आणि कन्हैया चॅटर्जी यांच्या शहादतीच्या पार्श्वभूमीवर २८ जुलै ते ३ ऑगस्ट या दरम्यान सुरू झालेला शहीद सप्ताह भाकपा माओवादी संपूर्ण देशभर साजरा करतात. दरम्यान नक्षलप्रभावित क्षेत्रात बंदचे आवाहन, शहीद स्मारक उभारून त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे, नक्षल्यांच्या मृत्यूचा बदल घेण्यासाठी घातपात घडवून आणणे, पोलीस आणि सरकारांचा निषेध करणारे बॅनर लावणे अशी कार्य प्रणाली असते. अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे नक्षली समर्थक बॅनर लावत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तीन नक्षली समर्थकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
शहीद सप्ताहा दरम्यान नक्षलवादी कारवायांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलसांनी ॲापरेशन सुरु केले आहे. या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात पोलीसांची गस्त वाढवण्यात आली असून, जंगलांमध्ये सी – ६० चे जवान अलर्टवर आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वीपासूनच नक्षल प्रभावित क्षेत्रासह जिल्ह्यात बॅनर्स लावून जनजागरण अभियान आणि नक्षलविरोधी शोध अभियान सुरु केले आहे.