स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाटबंधारे विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १३ ऑगस्ट
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याचे औचित्य साधुन संपुर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. जलसंपदा विभागांतर्गत गडचिरोली पाटबंधारे विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा बाईक रॅली, वृक्षारोपण, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी, स्वच्छता अभियान, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाट्य इत्यादी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत १० व १२ ऑगस्ट दरम्यान पाटबंधारे विभागा अंतर्गत विभागीय व उपविभागीय कार्यालयाची स्वच्छता मोहिम, विविध शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली, तसेच प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी दुपारी १२ वाजता तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅली ही “वंदे मातरम”, “भारत माता की जय” च्या जयघोषात गडचिरोली पाटबंधारे विभाग येथून सुरु होवून टी पाईंट, एल. आय. सी. चौक, आय. टी. आय. चौक, कारगिल चौक, इंदिरा गांधी चौक, एस.टी. बस स्थानक, पोटेगाव बायपास रोड, रेड्डी गोडाऊन, चामोर्शी रोड, शासकीय विज्ञान महाविद्यालय, गांधी चौक, आय.टी.आय. चौक व परत विभागीय कार्यालय कॉम्प्लेक्स अशाप्रकारे पूर्ण करण्यात आली.
सदर रॅलीमध्ये जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश गायकवाड, अधिनस्त उपविभागीय अभियंता संतोष वाकोडे, नरेंद्र मेश्राम, महिपाल मेश्राम, सहाय्यक अभियंता हर्षाली तुमराम, तसेच इतर सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभि, सहाय्यक व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.