शेतकऱ्यांना सोयाबीन पिक लागवडीचे प्रशिक्षण

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०४ ऑगस्ट
शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाविषयी माहीती व मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर आणि कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आदिवासी उपयोजने अंतर्गत शुक्रवारी सोयाबीन शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथे करण्यात आलेले होते. या एक दिवशीय प्रशिक्षणात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाविषयी माहीती जाणून घेतली.
सदर सोयाबिन शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमास सी. सी. आर. आय, नागपूर येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. यु. आर. सांगळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ (किटकशास्त्र ) डॉ. एन. एम. मेश्राम, कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ संदिप एस. कऱ्हाळे तसेच कृषि विज्ञान केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
संदिप एस. कऱ्हाळे यांनी सोयाबीन पिक लागवड तंत्रज्ञान व सोयाबीन पिकांची घ्यावयाची काळजी विषयक सखोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे जमीनीची उत्पादकता टिकविण्यासाठी व शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी तेलवर्गीय पिक घेणे गरजेचे आहे. जेणेकरून याचा फायदा जमीनीची सुपिकता वाढविण्यास होईल व शाश्वत उत्पादन मिळेल असे प्रतिपादन केले.
सोयाबीन पिक हे कमी कालावधीत आणि अधिक उत्पादन देणारे पिक असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड करावी असे आवाहन सी. सी. आर. आय, नागपूर येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. यु. आर. सांगळे यांनी केले. सोयाबीन पिकाची बिजप्रक्रिया सोयाबीन पिकांवर येणारे रोग व त्यांचे व्यवस्थापन विषयी विशेष मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांनी वातावरणाच्या अंदाजानुसार पिकावर तन नाशक/ किटकनाशकांची फवारणी करावी. सोयाबीन पिकावर स्पोडोप्टेरा किंवा पाने पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळल्यास त्यांच्या निरीक्षणासाठी हेक्टरी ८ कामगंध सापळे लावावेत व नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. सोयाबीन पिकावर खोडमाशी आढळल्यास त्याच्या नियंत्रणासाठी इंडोक्झीकार्ब १५.८ टक्के एस.सी. ७ मि.ली. किंवा क्लोट्रोनिलीप्रोल १८.५ एससी ३ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन शेतात विविध ठिकाणी ‘T’ आकाराचे पक्षीयांबे उभारावेत. मागील आठवड्यातील पाऊस, जास्तीची आर्द्रता आणि ढगाळ हवामान यामुळे सोयाबीन पिकावर पिवळा मोझेक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून शेताबाहेर नष्ट करावीत तसेच स्वच्छ हवामान परिस्थिती (शांत हवा, पाऊस व दाटलेले ढग नसताना आणि वाफसा असताना ई.) असताना थायमेथोक्झाम १२.६ टक्के + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५ टक्के झेड सी १२५ मिली प्रति हेक्टर किंवा बीटा सायफ्ल्यूथ्रीन ५.४९ टक्के + इमिडाक्लोप्रिड १९.८१ टक्के ओडी ३५० मिली प्रती हेक्टर ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सोयाबीन पिकावरील येणारे किडी तसेच फवारणी करतांना घ्यावयाची काळजी विषयी डॉ. सांगळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालन विषय विशेषज्ञ (कृषि) हवामानशास्त्र) नरेश पी. युध्देवार तर विषय विशेषज्ञ (कृषि अभि.) ज्ञानेश्वर व्ही. ताथोड यांनी आभार मानले