७१,९६९० रु. किमतीचा साडेसहा किलो गांजा जप्त, तीन आरोपी जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २९ मे
गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवारी रात्रीच्या दरम्यान शहरातील इंदिरानगर येथील वनउपज तपासणी नाक्यावर लावलेल्या नाकाबंदी दरम्यान ७१,९६९० रु. किमतीचा साडेसहा किलो गांजा जप्त करून तीन आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आशिष धनराज कुळमेथे, वय २८ वर्षे, रा. संजयनगर, चंद्रपुर, धनराज मधुकर मेश्राम, वय ३३ वर्षे, रा. नेहरुनगर, चंद्रपुर , आणि कु. ज्योती श्रीकृष्ण परचाके, वय २२ वर्षे, रा. शास्त्रीनगर, चंद्रपुर अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींच्या ताब्यातील वाहनाची पंचासमक्ष तपासणी केली असता, वाहनाचे डिक्कीत एकुण ९९६९० रुपये किंमतीचा ६ किलो ६४६ ग्रॅम गांजा, सहा लक्ष रु. किमतीचे चारचाकी वाहन तसेच २० हजार रुपये किंमतीचे मोबाईल असा एकुण ७ लक्ष १९ हजार रु. किमतीचा मुद्देमाल मिळुन आला. गांजा, मोबाईल तसेच गांजा वाहतुकीकरीता वापरलेले स्विफ्ट चारचाकी वाहन जप्त करुन आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (एन.डी.पी.एस.) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींना न्यायालयासमक्ष हजर केले असता, न्यायालयाने सदर आरोपींनाचा ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे नेतृत्वात सह पोलीस निरीक्षक रुपाली पाटील, हवालदार नरेश सहारे, हेमंत गेडाम, नाईक सतिश कत्तीवार, राकेश सोनटक्के, शिपाई उमेश जगदाळे, सचिन घुबडे, माणिक दुधबळे, लक्ष्मी बिश्वास, सविता उसेंडी, माणिक निसार, मनोहर टोगरवार यांनी पार पाडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संघमित्रा बांबोळे करीत आहेत.