विशेष वृतान्त

रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणीची फरफट; पुलाअभावी गर्भवतीचा स्ट्रेचरवरुन जीव मुठीत घेऊन नाल्यातून प्रवास

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २८ ऑगस्ट 

रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वत्र बहिणीच्या रक्षणाची शपथ घेतली जात असताना, एटापल्ली तालुक्यातील दुर्गम कोईंदूळ गावात मात्र एका गर्भवती बहिणीला स्ट्रेचरवरुन जीव मुठीत घेऊन भर पुरातून प्रवास करावा लागला.

शुक्रवारी (२८ ऑगस्ट) सकाळी सुमारे नऊ वाजता छाया नैताम यांना प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती. मात्र गावाला जोडणारा पक्का रस्ता आणि नदीवर पूल नसल्याने पुराचे पाणी आडवे आले. रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने छाया यांना स्ट्रेचरवरून पुराच्या पाण्यातून नदीपलीकडे नेले. तिथे उभ्या असलेल्या दुसऱ्या रुग्णवाहिकेतून त्यांना कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी एटापल्लीमार्गे हेडरी येथील एलकेएएम रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

नदीवर पूल नसल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही. अखेर गावकऱ्यांनी छाया सुरेश नैताम (२६) यांना स्ट्रेचरवरून नेत पुराच्या पाण्यातून नदी पार केली. त्यामुळे ‘लाडक्या बहिणी’ च्या सन्मानाच्या घोषणा आणि दुर्गम भागातील रस्ते व पुलांच्या अभावामुळे आदिवासींच्या जीवनातील वास्तवाचा फरक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

कोईंदूळमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. २० जुलै रोजी पुष्पा सुनील परसा या गर्भवती महिलेलाही रस्त्याअभावी तब्बल दीड किलोमीटर स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेपर्यंत न्यावे लागले होते. त्या घटनेनंतरही रस्ते आणि पुलाचा प्रश्न कायम आहे. आता अवघ्या काही आठवड्यांत पुन्हा त्याच गावातील गर्भवती महिलेला पुरातून स्ट्रेचरवरून नेण्याची वेळ आली आहे. एकाच समस्येमुळे वारंवार नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना प्रशासनाने मागील घटनेतून नेमका कोणता धडा घेतला, असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.

कोईंदूळसह परिसरातील चार गावांना दरवर्षी पावसाळ्यात याच समस्येला सामोरे जावे लागते. नदी-नाल्यांना पूर आल्यावर रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचत नाही. आजारी व्यक्ती, गर्भवती महिला किंवा अन्य आपत्कालीन रुग्णांना पुराच्या पाण्यातूनच बाहेर आणण्याची वेळ येते. एखादी घटना दुर्दैवी असू शकते; मात्र त्याच कारणामुळे वारंवार अशाच घटना घडत असतील, तर हा केवळ दुर्दैवाचा भाग राहत नाही. तो प्रशासनाच्या नियोजनातील आणि मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेतील गंभीर अपयश ठरतो. स्वातंत्र्याला ७९ वर्षे उलटूनही रस्ते आणि पूल यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

लोहखनिजाच्या समृद्धीमुळे एटापल्ली तालुक्यातून शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. मात्र याच तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये आजही रस्ता, पूल, आरोग्य आणि दळणवळणाच्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. एका बाजूला खनिजसंपत्तीमधून कोट्यवधींचा महसूल मिळत असताना दुसऱ्या बाजूला गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून स्ट्रेचरवरून न्यावे लागणे, ही विकासाच्या प्राधान्यक्रमांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. या महसुलातील किती निधी दुर्गम आदिवासी गावांच्या मूलभूत सुविधांसाठी खर्च होतो, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!