विशेष वृतान्त

राज्य सरकार केवळ फोडाफोडीच्या राजकारणातून सत्ता वाचवण्यासाठी धडपडत आहे – शशिकांत शिंदे

राज्यातील जनतेच्या समस्यांशी सरकारला घेणेदेणे नाही; राष्ट्रवादी (शप) आंदोलनातून सरकारला घेरणार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २५ ऑगस्ट 

गडचिरोली जिल्ह्यात आश्रमशाळेतील तीन विद्यार्थीनींचा जमीनीवर झोपल्यामुळे मृत्यू होतो, मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल कोसळतो, आरोग्य व्यवस्थेतील हेळसांडीमुळे प्रसुतीनंतर बाळ व मातेचा मृत्यु ओढवतो, सिरोंचा तालुक्यातील ४ वर्षीय मुलाचा चुकीच्या इंजेक्शनने मृत्यू होतो, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघातांची मालिका सुरू आहे तर दुसरीकडे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. अमरावती मध्ये तीन रुग्णांचा जळून मृत्यू होतो एक नाही तर अशा अनेक घटनांची मालिका महाराष्ट्रात सुरू असताना राज्य सरकार केवळ आमदार, पक्ष फोडाफोडी करुन सत्ता वाचवण्यासाठी धडपडत आहे. महाराष्ट्र सरकारला राज्यातील जनतेच्या समस्या आणि सुखदुःखाशी काहीही घेणेदेणे नाही. असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला.

ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात वक्ते म्हणून गडचिरोलीत आले असताना आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिंदे यांनी पुढे सांगितले की गडचिरोलीत घडलेल्या घटना या अत्यंत दुर्दैवी आहेत. या संदर्भात त्यांची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पक्षाने केली आहे. परंतु केवळ कारवाई करुन किंवा मृतकांच्या कुटूंबियांना सरकारी मदत देणे, एवढ्यानेच असे विषय संपवले जाऊ शकत नाहीत. अशा घटना होऊच नयेत, यासाठी सरकारने आवश्यक त्या उपाययोजना वेळीच करण्याची गरज आहे. परंतु सरकारचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सरकार विरोधात मोठे आंदोलन उभारले जाईल. यासाठी सध्या संघटन विस्तार आणि मजबुतीवर भर देण्यात येत आहे.

राज्य सरकारने न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल जाहीर करावा – अनिल देशमुख 
अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना त्यांचेवर पोलीस विभागातून १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि दीर्घकाळ जेलमध्ये रहावे लागले. या विषयावर देशमुख यांनी त्यावेळी या प्रकरणाची स्वतंत्र आयोगामार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. सरकारने त्यांची मागणी मान्य करीत न्यायमूर्ती चांदीवाल यांचे नेतृत्वात स्वतंत्र आयोग स्थापन केला होता. या आयोगाने अडीच वर्षांपूर्वी आपला १४०० पानांचा विस्तृत चौकशी अहवाल राज्य सरकारला दिला आहे. मात्र सरकार अजुनही हा अहवाल प्रसिद्ध करीत नाही. देशमुख यांनी यासाठी मुख्यमंत्र्यांना १३ पत्र पाठवले पण कारवाई होत नाही. त्यामुळे केवळ देशमुखांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणे एवढेच राज्य सरकारला अभिप्रेत आहे काय? असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिरोलीत उपस्थित केला. 

पत्रकारांना सत्य मांडण्यासाठी अडथळे आणणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे 

गडचिरोलीत सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी आश्रमशाळांसह विविध शासकीय आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष जाऊन सत्य लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाने त्यांचा संबंधित आस्थापनांमधील प्रवेश वर्जित करुन मज्जाव केला आहे. या संदर्भातील एका प्रश्नाच्या उत्तरात शिंदे म्हणाले की पत्रकार संरक्षण कायद्यात पत्रकारांना सत्य मांडण्यासाठी विविध संस्था, आस्थापनांमध्ये प्रवेशापासून मज्जाव करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यची तरतूद करावी अशी मागणी विधीमंडळात केली जाईल. 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शिंदे यांनी संघटन विस्तार आणि मजबूत केल्याशिवाय राज्यातील जनतेच्या समस्या सोडविता येणार नाहीत. असे सांगून पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे असे आवाहन केले.

पत्रकार परिषदेला माजी गृहमंत्री अनिल देशमुख, प्रदेश सचिव हिराचंद बोरकुटे, एड. संजय ठाकरे, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, प्रसिद्ध प्रमुख शेमदेव चाफले यांचेसह विविध आघाड्यांचे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!