जिल्ह्यातील युवकांना उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचा प्रयत्न
‘नवीन जमशेदपूर’ उभारण्याच्या दृष्टिकोनातून कार्य
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २८ मार्च
जिल्ह्यातील युवकांना उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड आंतरप्रेन्योरशिप या उपक्रमाने आणखी एक महत्त्वाची पायरी गाठली आहे. या उपक्रमाच्या दुसऱ्या प्रशिक्षण यशस्वी समारोप करण्यात आले. २८ जानेवारी रोजी सुरू झालेली ही बॅच २६ मार्च रोजी पूर्ण झाली असून २५५ प्रशिक्षणार्थींना कौशल्य प्रशिक्षणासह तत्काळ नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.
समारोपीय कार्यक्रमाला गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, रेसिडेंशियल डायरेक्टर हिम्मत सिंह, एक्झिक्युटिव डायरेक्टर एस. वेंकटेश्वरन यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी स्थापन केलेल्या लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड आंतरप्रेन्योरशिप या उपक्रमामुळे जिल्ह्यात सकारात्मक बदल घडताना दिसत असल्याचे म्हटले आहे. स्थानिकांना शाश्वत उपजीविका उपलब्ध व्हावी, यासाठी औद्योगिक प्रशिक्षण, लॉजिस्टिक्स-ड्रायव्हिंग आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रांमध्ये उत्कृष्टता केंद्रे उभारण्यात आली आहेत. यात वेल्डिंग, इलेक्ट्रिकल, वेअरहाऊस ऑपरेशन्स, ड्रायव्हिंग, फूड अँड बेव्हरेज सेवा, हाऊसकीपिंग, रिटेलींग आदी प्रशिक्षणांचा समावेश आहे.
१२ डिसेंबर २५ रोजी सॉफ्ट लॉन्च झाल्यापासून या उपक्रमाने उल्लेखनीय यश मिळवले आहे. पहिल्या बॅच मधील ५२७ उमेदवारांना १०० टक्के प्लेसमेंट मिळाले होते. प्रशिक्षण पूर्ण होताच अप्रेंटिसशिप देऊन “शिक्षण ते रोजगार” या प्रवासाला गती दिली.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी एल एम जी एस इ चा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी एल एम जी एस इ च्या कामगिरीचे कौतुक करताना, ही संस्था गडचिरोलीच्या समृद्ध भविष्यासाठी पायाभरणी करीत असून आतापर्यंत लॉयड्सने २००० हून अधिक कुशल कामगार घडवले आहेत. आमचे उद्दिष्ट केवळ शिक्षित नव्हे, तर सक्षम, अत्यंत कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे आहे.
गडचिरोलीचा विकास म्हणजे तेथील लोकांचे सक्षमीकरण. आम्ही येथे ‘नवीन जमशेदपूर’ उभारण्याच्या दृष्टिकोनातून कार्य करत आहोत.
प्रभाकरन यांनी कार्यक्रमात महिलांसाठी विशेष प्रगत ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्याची घोषणा केली. विविध प्रकारची वाहने चालवण्याचे प्रशिक्षण देण्याबरोबरच महिलांसाठी स्वतंत्र शौचालयांसह विशेष सुविधायुक्त वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने इंग्रजीत केलेल्या संवादाचे विशेष कौतुक करण्यात आले. एलएमजीएसई उपक्रमाच्या माध्यमातून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड गडचिरोलीतील युवकांना कौशल्य, आत्मविश्वास व रोजगाराच्या संधी प्रदान करत स्थानिक विकासाला नवी दिशा देत आहे.


