विशेष वृतान्तसंपादकीय

उत्तम समाज निर्मितीसाठी ग्रंथालयांची आवश्यकता

गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनानिमित्त विशेष लेख

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २६ ऑगस्ट 

ग्रंथालय म्हणजे एक इमारत एका रेषेत लावलेली पुस्तके पुस्तक घेणे त्याचे वर्गीकरण तालिकीकरण करून पुस्तकांची देवाणघेवाण करणे असाच सतत शांत रहा असे वारंवार सांगणारी लोकं अशी जागा असे सर्वांना वाटते. नवीन ज्ञानाची निर्मिती माहितीच्या स्वरूपात प्राचीन मातीच्या विटांवर रचुन आधुनिक काळात इलेक्ट्रॉनिक स्वरूपात गोळा करून त्याचे पुढील पिढीसाठी जतन करण्याचे काम आधुनिक काळातील ग्रंथपाल नेटाने करीत आहेत. त्यामुळे ग्रंथालयाचे महत्त्व चिरकाल अबाधित राहील.

ग्रंथालय म्हणजे वाचन आणि वाचन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे सांगितले जाते. वाचाल तर वाचाल पण इंटरनेटच्या मायाजालात आपले एकूणच पुस्तक वाचन कमी झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे थेट माहितीच आपल्यापर्यंत प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून येत आहे. या माहितीच्या पुरातून योग्य विश्वासार्ह माहिती शोधणे अवघड झाले आहे. चुकीचे स्त्रोत वापरले गेले तर नवे ज्ञान निर्माण तर होणारच नाही. परंतु संशोधनही चुकीच्या दिशेने केले जाईल. अशावेळी प्रत्यक्ष ग्रंथालयात जाऊनच ग्रंथांची पाहणी करूनच अध्ययन करणे योग्य राहील. शिक्षणाचा कायद्याच्या निर्मिती नंतर विशेष शाळा म्हणून सुविधांचे निकष जाहीर करण्यात आले.मात्र त्यात ग्रंथालयांचा निकष निश्चित केला गेला नाही. शिक्षणात कशापेक्षाही उत्तम माणूस घडविण्याचा साठीचा मार्ग म्हणून ग्रंथालयाकडे पाहायला हवे. आपल्या समाजात हरवलेल्या मुलांचा प्रवास पूर्ण स्थापित करायचा असेल तर शिक्षण संस्थांमधील ग्रंथालयांच्या बरोबरच सार्वजनिक ग्रंथालयांच्या बाबतीतील गंभीर विचार करण्याची गरज आहे.

शिक्षण संस्थांमध्ये जितके शिक्षक महत्त्वाचे असतात तितकीच ग्रंथालयाची सुविधा आणि वर्ग महत्वाचे असतात. शैक्षणिक गुणवत्ता विकासात ग्रंथालयाचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे जगभरात मान्य करण्यात आले आहे. शिक्षक समृद्धीची वाटही ग्रंथालयातून जात असते. शिक्षक वाचते झाले तर विद्यार्थी आपोआपच वाचते होतात. आपले शिक्षक
वाचत आहेत म्हटल्यावर मुलांमध्ये पुस्तक वाचण्याचे आकर्षण निर्माण होणार यात शंका नाही. खरे तर जो समाज वाचत असतो तोच समाज अधिक उत्तम असतो. त्या समाजात शहाणपणा, विवेक, फिरण्याचे काम ग्रंथालयाच्या माध्यमातून केले जात असते त्यामुळे जगाच्या पाठीवर अनेक प्रगत राष्ट्रांनी समृद्धीसाठी शाळा महाविद्यालयांच्या बरोबर गावागावातील विविध ग्रंथालय निर्मित करण्यावर भर दिला आहे. शाळा महाविद्यालय निर्मिती मागे देखील हीच भूमिका असली तरी त्या पलीकडे ज्ञान प्राप्तीसाठी ग्रंथालयाची निर्मिती आवश्यक ठरते. माणसाच्या आयुष्यात अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्या इतकी पुस्तके आणि वाचनाची गरज आहे की, जीवनात तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते म्हणजे पुस्तके, पुस्तके आणि केवळ पुस्तके. महानतेची वाट चालणाऱ्या माणसांच्या आयुष्यात पुस्तकांचे मूळ किती महत्त्वाचे आहे, हे महामानवांचे चरित्र वाचले की पुस्तकांचे स्थान अधोरेखित होते. वाचन हा एक आनंददायी अनुभव आहे. आज प्रति विद्यार्थी पाच पुस्तके असावी असे म्हटले आहे. विचार करून पुस्तकांची श्रेणीची उपलब्धता देखील महत्त्वाची आहे मुलांचा त्यांचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्तर त्यांचे भाषिक स्थळ मुलांची भाषा त्यांचा विचार पुस्तके निवड करताना गरज असते. पुस्तके महत्त्वाचे ठरतात अशा स्वरूपात शिक्षणाच्या संदर्भाने सूक्ष्म विचार करत पुस्तकांची निवड करण्याची प्रक्रिया आपल्याकडे फारशी होत नाही फक्त पुस्तकांची संख्या इतकाच विचार केला जातो. अनेक ठिकाणी पुस्तके असली तरी सार्वजनिक ग्रंथालयांना वाचकांची प्रतीक्षा आहे.

सामाजिक दारिद्र्य, निष्ठा, विवेक, शहाणपणाचा अभाव दिसून येतो तेव्हा समाज व राष्ट्राच्या पतनाची सुरुवात झाली आहे. असे समजावे. समाजात जेव्हा छोट्या माणसांच्या सावल्या उंच उंच पडू लागतात किंवा आपल्या माणसाचा आरंभ झाला आहे, असे दिसू लगते तेव्हा सामाजिक चित्र अधिक भेसुर दिसु लागते. आज भ्रष्टाचाराचा आलेख उंचावतो आहे. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी कायदे केले जात आहेत. विविध विभाग निर्माण केले जात आहेत. कायदे केले म्हणजे भ्रष्टाचार करणारा माणूस भ्रष्टाचार थांबवतो असे घडत नाही. भ्रष्टाचार मस्तकात असलेला माणूस त्यासाठी नव्या पळवाटा शोधत असतो. मस्तकात असलेला भ्रष्टाचार हा कायद्याने दूर केला जाऊ शकत नाही. त्यासाठी चांगले मस्तक घडविण्यासाठी, गरज आहे ती केवळ ग्रंथालयांची. प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे म्हणतात याची मस्तके पुस्तके घडवितात. ती “कोणाच्या चरणावर नतमस्तक होत नाही” समाजाची लाचारी  कमी करण्यासाठी देखील पुस्तके मदत करतात. आपल्याला उत्तम समाज निर्माण करायचा असेल तर ग्रंथालयाची गरज अधोरेखित आहे.  ग्रंथालय निर्माण करण्यासाठी सरकारी पातळीवर विशेष, जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत त्याशिवाय सामाजिक उत्थान होण्याची शक्यता नाही. समृद्ध ग्रंथालय हाच उद्याचा उन्नत आणि प्रगत समाज, राष्ट्र निर्मितीचा एकमेव राजमार्ग आहे ती वाट अधिक अंधुक होत असल्याने समाजात अज्ञानाचा अधिकार दाटून आला आहे.

डॉ. वर्षा आ. तिडके ( शनिवारे ) varshaatidke21@gmail.com                  mb. 9421557700 लेखिका फुले – आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्र विभाग प्रमुख आहेत. 
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!