आपला जिल्हाताज्या घडामोडी

एकात्म मानववादाचा विचार हा नव्या राष्टवादाची मांडणी – आषुतोष अडोणी

विरोधाच्या सावटात गोंडवाना विद्यापीठात पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद अध्यासनाचे उद्घाटन ; विरोधकांचा भर पावसात मोर्चा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १९ ऑगस्ट 

गोंडवाना विद्यापीठात विरोधाच्या सावटात शनिवारी कडेकोट बंदोबस्तात पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद अध्यासनाचे उद्घाटन संपन्न झाले. सुप्रसिद्ध विचारवंत आषुतोष अडोणी हे विद्यापीठाच्या सभागृहात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानववादाचे स्वरूप आणि महत्ता विषद करीत होते. त्याचवेळी विद्यापीठाच्या मार्गावर अध्यासनाचे विरोधक, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अडवून ठेवल्यामुळे त्याच ठिकाणी गोंडवाना विद्यापीठ आणि कुलगुरूंचा निषेध व्यक्त करीत होते. संघ प्रचारक कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे हटाओ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

तर सभागृहात उद्घाटनीय भाषण करताना आषुतोष अडोणी सांगत होते की परप्रकाश घेऊन भारतीय समस्यांची उत्तरं सापडणार नाहीत. त्यासाठी भारताचा विचार,आत्मा आणि धारणा शोधणे गरजेचे आहे. भारताच्या स्वभावाचा शोध घेतल्याशिवाय समस्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केल्यास फसगत झाल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी एकात्म मानववादातून समाजाची आर्थिक रचना कशी असावी याचे मार्गदर्शन केले आहे. मानव हाच एकात्म मानववादाचा आधार असुन त्याच्या सुखाचे अर्थशास्त्र मांडले आहे. एकीकडे भांडवलवाद आणि साम्यवाद या दोन्ही आर्थिक संकल्पना निष्प्रभ ठरल्या.अशावेळी भारताच्या सर्वांगीण विकासासाठी अंत्योदयाची संकल्पना पुढे आली आणि त्याची प्रभावी मांडणी एकात्म मानववादातून पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी केली. या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठात या अध्यासनातून विद्यार्थ्यांना समाजकारण, अर्थकारण आणि राष्ट्रकारणाचे गिरवता येतील. यासोबतच विद्यापीठ बिरसा मुंडा आदिवासी सांस्कृतिक अध्यासनासह, महात्मा ज्योतिबा फुले, वामनदादा कर्डक,संत तुकाराम महाराज, सावित्रीबाई फुले असे वेगवेगळे अध्यासन निर्माण करुन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ऊपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की देशात राष्ट्र या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. सध्या जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नव्या डिजीटल क्रांतीच्या दुष्टचक्रात अडकलेले आहे. या डिजिटल क्रांतीने अर्थकारणातील समाजजीवनातील आणि ऊत्पादकतेमधील माणसांच स्थानच नष्ट करण्याचा चंग बांधला आहे. अशावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आव्हान पेलायचे कसे? यासाठी विद्यापीठांतून बौद्धिक प्रयत्न झाले पाहिजेत. कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांनी यावेळी प्रासंगिक विचार व्यक्त केले.

अध्यासन रद्द होणार नाही तोपर्यंत उपोषण

उद्घाटन समारंभ संपताच आदिवासी विकास युवा परिषद व अन्य अध्यासन विरोधकांचा मोर्चा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचला आणि तिथे त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अध्यासन रद्द करण्याची जोरदार मागणी केली. आणि सोमवार पासून विद्यापीठासमोर अध्यासन रद्द होणार नाही तोपर्यंत उपोषण करण्याची घोषणा केली. 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!