गोंडवाना विद्यापीठातील ८० टक्के महाविद्यालयांत पूर्णवेळ प्राचार्यांचा अभाव
कार्यकारी प्राचार्य, स्वाक्षरी अधिकार दिलेले संस्थाचालकांचा भरणा अधिक
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २७ मे
आपल्या पहिल्या तपपूर्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंडवाना विद्यापीठातील ८० % महाविद्यालयांतील पूर्णवेळ प्राचार्य, परिपूर्ण प्राध्यापक वर्ग यांसह अन्य प्रशिक्षित सेवक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विद्यापीठाशी संलग्नित १८४ महाविद्यालयांपैकी केवळ ४७ महाविद्यालयांत म्हणजेच २० टक्के महाविद्यालयांत पूर्णवेळ प्राचार्य असून १३७ महाविद्यालयांत कार्यकारी प्राचार्य, स्वाक्षरी अधिकार दिलेले संस्थाचालक, सेवानिवृत्त किंवा तात्पूरते प्राचार्य कार्यरत आहेत. तर ११ महाविद्यालयांतील प्राचार्य पदच रिक्त आहेत. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठातील शिक्षणाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२०१२ ला चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याकरीता स्वतंत्र असे गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले. स्थापनेपासूनच हे विद्यापीठ वादग्रस्त ठरले. प्रथम कुलगुरूंच्या नियुक्ती पासून ते विद्यापीठातील सर्व प्रकारची पदभरती प्रक्रिया सुद्धा वादग्रस्त आणि भ्रष्टाचारात बरबटलेली ठरली. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून १२- बी चा दर्जा मिळण्यासाठी १० वर्ष प्रतिक्षा करावी लागली. विद्यापीठासाठी आवश्यक जमिन खरेदी प्रक्रिया वादग्रस्त ठरली. अनेक नियुक्त्या अवैधपणे केल्याच्या तक्रारींचा डोंगर उभा राहिला. अशा परिस्थितीत गोंडवाना विद्यापीठाच्या शिक्षणाचा दर्जा कसा काय उंचावला असा गंभीर प्रश्न विचारला जात आहे.
विद्यापीठात चंद्रपूर जिल्ह्यातील ४४ आणि गडचिरोली जिल्ह्यातील २९ अशा ७३ महाविद्यालयांत कार्यकारी प्राचार्य कार्यरत आहेत. ,११ महाविद्यालयांतील प्राचार्यांची पद रिक्त असून ४ सेवानिवृत्त प्राचार्य सुध्दा काम बघत आहेत. याही पेक्षा गंभीर बाब अशी की जवळजवळ ५० महाविद्यालयांत संस्थाचालकांना प्राचार्यांचे स्वाक्षरी अधिकार बहाल केले आहेत. यात कांग्रेस नेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार, डॉ. नामदेव उसेंडी यांची पत्नी यशोधरा किरंगे, डॉ.अविनाश वारजूरकर, भाजप नेते माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष जेसामल मोटवानी, स्वप्निल दोंतूलवार, अरुण मोटघरे, गांधी वादी नेते प्रकाश अर्जूनवार अशा प्रमुख राजकीय लोकांचा समावेश आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषांनुसार अपरिहार्य परिस्थितीत स्वाक्षरी अधिकार देण्याची व्यवस्था केली आहे. मात्र याचा लाभ घेऊन राजकीय नेते आणि संस्थाचालक वेगवेगळे लाभ पदरात पाडून घेण्यासाठी याचा वापर करताना दिसतात.
गोंडवाना विद्यापीठात २०२१ या वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात १३३ तर गडचिरोली जिल्ह्यात ७९ अशी २१२ महाविद्यालय होती.२०२३ मध्ये ही संख्या १८४ वर आली आहे. यात २८ महाविद्यालय कमी दिसत असली तरी प्रत्यक्षात ४० पेक्षा अधिक महाविद्यालय बंद पडली असून १२ ते १५ नवीन महाविद्यालय सुरू झाली आहेत. यापैकी ६० टक्के महाविद्यालयांची अवस्था गलितगात्र झालेली आहे. तर काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त करून देण्याचे कंत्राटच घेतले असल्याचे चित्र दिसून येत आहे. दुर्गम भागातील महाविद्यालये, विशेष करून कार्यकारी प्राचार्य आणि स्वाक्षरी अधिकार प्राप्त महाविद्यालयांची शैक्षणिक दुरवस्था झाली आहे. कंत्राटी प्राध्यापक, संस्थाचालक आणि परिक्षार्थी यांच्या परस्पर सहकार्याने अशी महाविद्यालयं अपार यश पादाक्रांत करीत असल्याचे विद्यापीठाच्या निकालावरून स्पष्ट होते.
प्राचार्यांची संख्या वाढवण्यावर भर
विद्यापीठाची सुरूवातीची काही वर्ष पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात गेली. आता विद्यापीठ स्थिरावते आहे. युजीसीच्या निकषांनुसार पूर्णकालीन प्राचार्य मिळणे हेही काहीसे कठीण काम आहे. तरीही प्राचार्यांची संख्या वाढवण्यावर विद्यापीठाचा भर आहे. सध्या ४७ प्राचार्य आहेत पुढील वर्षात ते ७० पर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली