बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष गडचिरोली चिमूर लोकसभा लढवणार
जिल्हा प्रभारी राज बन्सोड यांची माहिती . शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी जनतेच्या मूळ प्रश्नांना जाहीरनाम्यात स्थान

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १९ मार्च
आगामी लोकसभेला घेऊन महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अद्यापही उमेदवारीवरून खडाजंगी चालू असताना गडचिरोली चिमूर क्षेत्रातील एकही उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. अशावेळी मागील निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटकपक्ष राहिलेल्या बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाने गडचिरोली चिमूर लोकसभा लढविणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांची धडधड वाढली आहे.
भारतीय जनता पक्ष हा भांडवलदार समर्थक व संविधान विरोधी विचार पेरणारा पक्ष असल्याने सत्तेत आल्यास लोकशाहीसाठी अत्यंत घातक ठरणार आहे त्यामुळे मागील निवडणुकीत आपण महाविकास आघाडीसाठी काम केले व यावेळी सुद्धा करण्याची भूमिका असल्याचे स्पष्ट करतानाच महाविकास आघाडी आंबेडकरी मतांचा सन्मान करत नसेल आणि आपल्याच तोऱ्यात असेल तर २० मार्च पर्यंत पक्षाचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांच्या आदेशानुसार बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चर्चेसाठी दार खुले ठेवणार आहे मात्र तसे न झाल्यास लोकसभेच्या मैदानात विदर्भातील ६ लोकसभा क्षेत्रात ताकदीने उमेदवार उतरविणार असल्याचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष विशेष फुटाणे यांनी सांगितले. शिक्षण, आरोग्य, बेरोजगार, शेतकरी, कामगार व विद्यार्थी अशा मुद्याना घेऊन निवडणुकीत उतरणार असेही सांगण्यात आले.
गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात पक्षाकडे तीन, चार उमेदवार असून योग्य वेळी या नावांची घोषणा केली जाईल असेही त्यांनी सांगितले . यावेळी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष विशेष फुटाणे, प्रदेश महासचिव भास्कर बांबोळे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, बी आर एस पी शहर सचिव नागसेन खोब्रागडे, आदिवासी विकास परिषदेचे विनोद मडावी, कुणाल कोवे, सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी मारोतराव मडावी, बी आर एस पी उपाध्यक्ष अरविंद वाळके, रिटायर्ड सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर चिंतुरी, महिला आघाडी जिल्हासचिव शहराध्यक्ष शोभा खोब्रागडे, शहराध्यक्ष विद्या कांबळे, संघटक आवळती वाळके, शहर सचिव प्रतिमा करमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम मडावी उपस्थित होते.