गोंडवाना विद्यापीठास शासनाचे ५ कोटी रुपयाचे नवसंशोधन केंद्र मान्य
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ३० ऑगस्ट
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्ट अप धोरण २०१८ च्या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठाने घेतलेल्या नवउद्योजक (स्टार्ट अप) उपक्रमाला सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठातर्फे सादर करण्यात आलेल्या वर्ग १ नवसंशोधन केंद्र (इन्क्युबेटर) सुरू करण्याच्या प्रस्तावास सोमवारी मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. सदर नवसंशोधन केंद्रास ५ वर्षे कालावधीकरीता ५ कोटी रूपयांची आर्थिक सहाय्यतेची तरतूद असून किमान २५ नवउद्योजक निर्मितीचे लक्ष्य असणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचा रहिवास, वनसंपदा व भौगोलिकदृष्ट्या असलेले दुर्गम स्थान विचारात घेता, विद्यापीठ परिक्षेत्रातील युवक व युवतींना नवउद्योजक (स्टार्ट अप्स) म्हणून स्थापित करण्यास्तव नवसंशोधन केंद्राची (इन्क्युबेटर) सुविधा विद्यापीठात उपलब्ध होणे अत्यावश्यक होते.
गोंडवाना विद्यापीठाने नवउदयोजक निर्मिती पोषक वातावरण निर्माण करण्याहेतू गत चार वर्षामध्ये विविधांगी कार्यक्रम व उपक्रम घेतले. यामध्ये प्रामुख्याने चंद्रपूर व्यवसाय स्पर्धा २०१९, हिरकणी- नवउद्योजक स्पर्धा २०१९, कौशल्या वर आधारित १ वर्षीय बांबू पदविका तसेच १६ प्रमाणपत्र अभ्यासक्रम, एकल- वन व गौण उपज आधारित ग्रामसभा क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रम, घटक आदर्श महाविद्यालया तर्फे रोजगार भिमुख अभ्यासक्रम, ग्रामसभा करीता वन उपज आधारित समूह उदयोजकता कार्यक्रम, विद्यापीठ स्तरीय कल्पनाशक्ती स्पर्धे मार्फत एकूण १७ व्यवसाय क्षमता असलेल्या कल्पनांची निवड इत्यादींचा समावेश आहे. तसेच घटक आदर्श महाविद्यालय अंतर्गत स्थानिक आदिवासी युवती व महिलांसाठी रोजगार निर्मिती हेतू खादी सूत गालिचा निर्मिती व प्रशिक्षण केंद्र प्रस्ताव राज्य व केंद्र शासनास सादर केलेला आहे.
सध्यस्थितीत सदर नवसंशोधन केंद्र विद्यापीठाच्या नूतन प्रशस्त इमारतीत १०००चौ. फु. समर्पित जागेत कार्यावित असून नवउद्योजक निर्मिती करीता एकूण ८ व्यवसाय अनुलंबाची ओळख करण्यात आलेली आहे. तसेच नवउद्योजक निर्मिति हेतू लागणारे कलम ८ प्रमंडळ नोंदणी करून निर्गमित करण्यात आले असून केंद्राने दैनंदिन कामकाज व मार्गदर्शन हेतू संचालक मंडळ तसेच कार्यकारी समितीचे गठण करण्यात आलेले आहे.
याअनुषंगाने विद्यापीठाने वर्ग १ इन्क्युबेटरचा तपशिलवार प्रस्ताव कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागास सादर केलेला होता. गोंडवाना विद्यापीठातर्फे सादर करण्यात आलेल्या वर्ग १ इन्क्युबेटर सुरू करण्याच्या प्रस्तावास मान्यता प्रदान करण्यात आली असून ५ वर्षे कालावधीकरीता ५ कोटी रूपयांची आर्थिक सहाय्यतेची तरतूद असून किमान २५ नवउद्योजक निर्मितीचे लक्ष्य असणार आहे.
सदर इन्क्युबेटर स्थापित करण्याकरीता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, यांचे कुशल नेतृत्व व व्यापक अनुभव तसेच प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, यांचे मार्गदर्शन आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, संचालक परिक्षा मुल्यमापन मंडळ डॉ. अनिल चिताडे, यांचे सहकार्य लाभले.