गडचिरोलीत आठवडाभरात दुसरा माता – बाल मृत्यू; आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ३१ ऑगस्ट
गडचिरोलीतील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात भरती असताना झालेल्या प्रसुतीत संबंधित मातेसह तिच्या बाळाला वाचवण्यात वैद्यकीय पथकाला यश आलेले नाही. आठवडाभरात प्रसुती दरम्यान माता आणि बाल मृत्यूच्या दोन घटना घडल्यामुळे जिल्ह्याच्या शहरी भागातील, आणि तज्ज्ञ डॅाक्टरांच्या देखरेखीत चालणाऱ्या आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
नाजुका दिवाकर राऊत (२८ वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. नागभिड तालुक्यातील कोजबी गावातील रहिवासी असलेल्या नाजुका प्रसुतीसाठी आपल्या माहेरी चकपिरंजी (ता.सावली) येथे आल्या होत्या. त्यांना २८ ऑगस्टच्या रात्री गडचिरोलीच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. २९ ला सकाळी सामान्य प्रसुती झाली. मात्र काही वेळातच सुदृढ असलेल्या बाळाचा मृत्यू झाला. प्रसुतीनंतर काही वेळाने नाजुका यांना रक्तस्राव सुरू झाला. तिची प्रकृती गंभीर होत असल्याने स्रीरोगतज्ज्ञ डॅा.प्रवीण किलनाके आणि डॅा.प्रशांत आखाडे यांना बोलवण्यात आले. पण ते पोहोचेपर्यंत महिलेचे प्रकृती आणखी जास्त बिघडली.
यादरम्यान शस्रक्रिया करून रक्तस्राव नियंत्रित करून रक्त चढवण्यात आले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास प्रकृती थोडी सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र २९ च्या मध्यरात्री नाजुका यांना झटके येण्यास सुरूवात झाली. जवळपास एक तास सुरू असलेल्या उपचारानंतर रात्री दीडच्या सुमारास त्यांचा मृ्त्यू झाला.
रक्त मिळण्यास विलंब, नातेवाईकांचा आरोप
सदर महिलेला रक्ताची गरज असताना वेळेवर रक्त देण्यास रुग्णालयाच्या यंत्रणेने विलंब केला, त्यामुळे नाजुका यांची प्रकृती जास्त गंभीर झाली असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या महिनेसह तिच्या बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणीही नातेवाईकांनी केली आहे. आठवडाभरापूर्वी हाच प्रसंग चामोर्शी तालुक्यातील जिजा सातर या महिलेवर ओढवला आणि तिच्यासह तिच्या बाळाला प्राण गमवावे लागले.
दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा – आसपा
गडचिरोलीत आरोग्य व्यवस्थेने ८ दिवसांत दुसरा बळी घेतल्याचा आरोप करीत दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा, केवळ निलंबनाची दिखाऊ कारवाई नको अशी मागणी आजाद समाज पार्टीने केली आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, अवघ्या ८ दिवसांत आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा एका निष्पाप मातेचा व बाळाचा जीव गेला. वारंवार होणाऱ्या मृत्यूंनंतरही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ठोस उपाययोजना करत नसल्याने जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. दोषींवर केवळ निलंबनाची कारवाई करून प्रकरण मिटवण्याचा प्रकार आता बंद करा. अधिकारी व कर्मचाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केली आहे.



