उलगुलान’च्या पुढाकाराने होणार नक्षलग्रस्त भागातील दहा विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार
उस्मानाबाद येथील ‘लिफ्ट फॉर अप्लिफ्टमेंट’ संस्थेचा प्रयत्न

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १६ जून
नक्षल्यांच्या दहशतीमुळे आणि शासन प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही मूलभूत सोयी सुविधा पोहोचल्या नाही. अशा विपरीत परिस्थितीत उस्मानाबाद येथील ‘लिफ्ट फॉर अप्लिफ्टमेंट’ संस्थेच्या उलगूलान या संकल्पनेतून या भागातील दहा विद्यार्थ्यांनी यंदा वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा ‘नीट’ यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे.
नक्षल्यांच्या गड समजल्या जाणाऱ्या अबुझमाड परिसरातील तुरेमर्काचा रहिवासी राकेश पोदाळी आणि बिनागुंडा येथील सुरेश पोदाडी याचा समावेश आहे. उस्मानाबाद येथील ‘लिफ्ट फॉर अप्लिफ्टमेंट’ संस्थेने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या ‘उलगुलान’ या निःशुल्क वर्गामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दहा विद्यार्थ्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
एकीकडे देशभर स्वातंत्र्याची पंच्याहत्तरावी साजरी केली जात आहे. तर दुसरीकडे गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल, आर्थिक मागास, शासन आणि प्रशासनाकडून दुर्लक्षित जिल्ह्यातील भामरागड सारख्या अतिदुर्गम तालुक्यातील बराचसा परिसर पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. परिणामी येथील आदिवासी आणि इतर समुदायाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागतो. घरात अठराविश्व दारिद्र्य आणि सोयी सुविधांचा अभाव यामुळे बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी डॉक्टर होऊ शकतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन ‘लिफ्ट फॉर अप्लिफ्टमेंट’ संस्थेचे डॉ. अतुल ढाकणे आणि त्यांच्या चमूने मेळघाटसह गडचिरोली जिल्ह्यातील गरीब आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे (नीट) मोफत निवासी वर्ग चालू केले. या वर्गाला ‘उलगुलान’ असे नाव देण्यात आले.
यावर्षीच्या वर्गातून गडचिरोली जिल्ह्यातील दहा विद्यार्थी एमबीबीएससाठी पात्र ठरले आहे. यात राजु दुर्गम (टेकाडाताल्ला ता. सिरोंचा) पुष्पा जाडी( चिंतादेवाला), आकाश कोडायामी ( गावानहेट्टी ता.गडचिरोली ) रोहिणी मांजी (पल्ली ता. भामरागड), सचिन अर्की (गोपनार ता.भामरागड), सुरज पोदाडी (बिनागुंडा ता.भामरागड), श्रुती कोडायामी (भामरागड), राकेश पोदाळी (तुरेमर्का ता.भामरागड) अल्तेश मिच्छा( भामरागड), रेणुका वेलादी (अहेरी) यांचा समावेश आहे. पायाभूत वैद्यकीय सुविधांचा अभाव असलेल्या भागातील हे विद्यार्थी भविष्यात डॉक्टर होऊन आपल्या भागातील कन्ना मडावी होऊन सेवा देतील असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे.