संपादकीय

अभिजीत दीपकेंचा गडचिरोली दौरा मॅनेज्ड आणि हायजॅक?

वृत्तविष्लेषण / हेमंत डोर्लीकर

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि . १८ सप्टेंबर 

सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी आदिवासी विभागातील ‘स्कूल ठीक करो’ हा विषय घेऊन राज्यात गडचिरोली जिल्ह्यापासुन आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा केला. १७ सप्टेंबर ला एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीन प्राथमिक शाळांना भेट देऊन तेथील वास्तव पुढे आणण्याचा प्रयत्न केला. यात शाळा इमारतींची दुरवस्था, पेयजल आणि स्वच्छता या बाबींवर भर आणि शैक्षणिक स्तर यावर त्यांचा भर होता, असे प्राथमिक दृष्ट्या दिसून आले. परंतु या दौऱ्याकडे अधिक बारकाईने पाहिले असता, दीपके यांचा दौरा वेल मॅनेज्ड आणि भाकपाच्या एटापल्ली येथील दोन नेत्यांकडून हायजॅक केलेला तथा शिक्षणावरील डाक्यूमेंट्री बनविण्यासाठी केला गेला असल्याचे दिसून आले. या दौऱ्यात दीपके यांनी डाक्यूमेंट्रीसाठी जोरदार फोटोशूट आणि व्हिडीओ काढले. त्यांच्या गडचिरोली आगमनापासूनच भेटीगाठी आणि चर्चा करण्यावरुन राजी नाराजीचे नाट्य रंगले होते.

त्यांच्या दौऱ्यादरम्यान एटापल्ली तालुक्यातील डुम्मे, कोसा-आलेंगा, कोहका आणि पयडी येथील शाळांना भेट देऊन शैक्षणिक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. डुम्मे येथील शाळेत पालकमंत्री असलेले मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेल्या स्कूल बॅग वाटल्या परंतू मुलींच्या स्वच्छतागृहाला दारच नसून त्याचा वापर किती दिवसांपूर्वी झाला हे सांगता येत नाही. स्वच्छतागृहावर शेड सुद्धा नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे फोटो बॅगवर नव्हे तर शाळेची वास्तवात दर्शविणाऱ्या स्वच्छतागृहावर लावले पाहिजे. अशी टीका अभिजीत दिपके यांनी शाळेला भेट दिल्यानंतर केली. कोसा आलेंगा ही शाळा शासनाने पुरेशा पटसंख्येअभावी मागील तीन वर्षांपासून बंद केली आहे. आणि येथील शिक्षकांचे तालुक्यात इतरत्र समायोजन झाले आहे. अशा बंद शाळेला दीपकेंनी भेट दिली. यातून ते कोणता संदेश देऊ इच्छित होते हे कळायला मार्ग नाही. याची सविस्तर माहिती घेतली असता, एटापल्ली येथील भाकपच्या ज्या नेत्यांनी हा दौरा हायजॅक केला त्यांनी भाकपचे जिथे कार्यकर्ते आहेत आणि आगामी ग्रामपंचायत व जिप निवडणूकीत पक्षाला लाभ होईल अशा ठिकाणीच दीपकेंची शाळा भेट ठरवली आणि आपला प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न केला. परिणामी एटापल्लती ‘स्कूल ठीक करो’ अभियान हे ‘भाकप ठीक करो’ अभियान ठरल्याचे दिसून आले.

या पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी तसेच पालकांशी संवाद साधून शाळांमध्ये भेडसावणाऱ्या विविध समस्या जाणून घेण्यात आल्या. काही समस्या तातडीने संबंधित विस्तार अधिकारी आणि गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत त्या सोडविण्याची मागणी दीपके यांनी दूरध्वनीद्वारे केली. असे जरी दीपकेंच्या दौऱ्यानंतर व्हायरल झालेल्या चित्रफितीतून दिसत असले तरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि गटशिक्षण अधिकारी हे समस्या सोडवण्यासाठी सक्षम अधिकारी मानले गेले असते तर समस्याच उद्भवल्या नसत्या. हे समान्य माणसालाही कळते. अशावेळी त्यांना दुरध्वनी करणे हे कितपत प्रभावी ठरते असा प्रश्न विचारला जातोय. सर्वसाधारणपणे किमान प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किंवा जिप चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समस्येची माहिती देऊन सोडविण्याच्या सुचना दिल्या असत्या तर ते त्यांच्या पदाला शोभणारे ठरले असते. अशी प्रतिक्रिया भेटी प्रसंगी उपस्थित असलेल्या काहींनी बोलून दाखवली.

शुक्रवारी भामरागड येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या आश्रमशाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. शाळेच्या स्थितीबाबत समाधान व्यक्त केले. भामरागडमधील ताडगावच्या जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. येथेही पायाभूत सुविधांची कमी आणि खालावलेला शिक्षणाचा दर्जा पहायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. भामरागड येथील भगवंतराव अनुदानित आदिवासी आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली असता अत्यल्प विद्यार्थी संख्या असल्यामुळे दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. तर पाहणीनंतर दीपके यांनी वस्तुस्थिती मांडताना पाहून मुख्याध्यापक पठाण संतापले व दीपके यांचेशी बाचाबाची केली. यानंतर बोलताना ते दारूच्या नशेत असल्याचे लक्षात आले असता दीपके यांनी त्यांना पोलीसांच्या स्वाधीन करुन वैद्यकीय तपासणी करताच मुख्याध्यापक पठाण हे दारुच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले. यावरुन त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या दौऱ्यात आझाद समाज पार्टी गडचिरोलीचे जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी दीपके यांना जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रातील विविध प्रश्नांची माहिती दिली. आझाद समाज पार्टीकडून या विषयांवर सातत्याने काम केले जात असून जिल्ह्यातील उपलब्ध डेटा आणि वस्तुनिष्ठ माहिती सीजेपी समोर सादर करण्यात येईल, असे मडावी यांनी सांगितले.
त्यावर अभिजित दीपके यांनी उपलब्ध माहितीच्या आधारे या प्रश्नांवर काम करण्याचे आश्वासन दिले असले तरी ते प्रत्यक्षात किती उतरेल हे आगामी काळात दिसून येईल.
दीपके यांच्या संपूर्ण गडचिरोली दौऱ्यावर पोलीसांचे विशेष करून गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांचे सावट असल्याचे दिसून आले. काही अधिकाऱ्यांनी दीपकेंसोबत आलेल्या सहकाऱ्यांना भ्रामक माहिती देऊन दौऱ्यावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न केला. एका अधिकाऱ्याने तर सीजेपीच्या गडचिरोली येथील समर्थकांना धमकावत आझाद समाज पार्टीच्या लोकांशी संबध ठेवले तर अडचणीत याल अशी तंबी सुद्धा दिली असल्याचे समोर आले आहे.
दीपके यांच्या दौऱ्यामध्ये वास्तविक जिल्ह्यातील काही शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांना भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु आयोजकांनी या मुद्द्याला बगल दिली.शासकीय आणि अनुदानित शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांना जर आढावा घेतला असता तर जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशांने मृत्यू प्रकरणानंतर इतर आश्रमशाळांमध्ये कोणत्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या गेल्या, याचे आकलन करता आले असते. आणि शासन स्तरावर सुधारणा करण्यासाठी उपाययोजना केल्या जाऊ शकत होत्या.

 

तरुण आणि कार्यकर्त्यांची भेटीची अपेक्षा, भेटीअभावी नाराजी

दरम्यान, अभिजित दीपके यांच्या गडचिरोली आगमनाची माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक तरुण, सामाजिक राजकीय कार्यकर्ते आणि समर्थक त्यांची भेट घेण्यासाठी उत्सुक होते. मात्र व्यस्त कार्यक्रम यामुळे सर्वांना प्रत्यक्ष भेटणे शक्य होणार नसल्याचे सांगून दिपके यांनी भेट टाळली. त्यामुळे काही कार्यकर्ते आणि दीपके यांना भेटण्यास उत्सुक असलेल्या तरुणांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले.

ज्यांनी सीजेपीसाठी आंदोलन केले, त्यांनाच भेट नाकारली

आम्ही दुपार पासून वाट दीपके यांची पाहत होतो. रात्री १ वाजता आगमन झाल्यानंतर आपले अनेक समर्थक ज्यांनी आंदोलनात सहभाग घेतला ते भेटायला उत्सुक आहेत असे सांगितले. पण रात्री थकलो असल्याचे सांगत अभिजित नी आम्हाला भेटू दिले नाही. सकाळी सुद्धा आमच्यासोबत १० मिनिटे वेळ देण्याची विनंती केली असता ती नाकारली. आम्ही तरुणांनी गडचिरोली मध्ये जंतर मंतर चे आंदोलन केले, आजाद समाज पार्टी ने आमच्या आंदोलनाला दिशा दिली पण अभिजित ने आम्हालाच जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले. ही आमची खंत आहे.

सुरज पिपरे (सीजेपी समर्थक )

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!