विशेष वृतान्त

आत्मसमर्पित भुपती गोंडवानाच्या एकल उपक्रमाचा समन्वयक म्हणून काम पाहणार; नक्षलवाद्यांसाठी रणनीती तयार करणारे हात आता आदिवासी ग्रामसभांच्या हक्कांचे रणनीतीकार होणार

ठोकशाही ते लोकशाही असा नाविन्यपूर्ण प्रवास

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १ सप्टेंबर 

एकेकाळी हातात बंदूक घेऊन नक्षलवाद्यांसाठी रणनीती तयार करुन जंगलात वावरणारे हात आता लोकशाही मार्गाने आदिवासी ग्रामसभांच्या हक्कांसाठी नव्या रणनीतसहीत कागदपत्रे हाताळणार आहेत. नक्षलवादी चळवळीतील प्रमुख नेता म्हणून ओळखले जाणारे मल्लोजुला वेणुगोपाल राव ऊर्फ भूपती यांनी शस्त्राचा मार्ग सोडल्यानंतर त्यांच्या आयुष्याला आता नवी दिशा मिळाली आहे. गोंडवाना विद्यापीठाने त्यांची ‘एकल’ उपक्रमात समन्वयक म्हणून नियुक्ती केली असून, ग्रामसभा आणि आदिवासींना त्यांच्या कायदेशीर हक्कांसाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

बीकॉमपर्यंत शिक्षण झाल्यामुळे भूपतीची नक्षलवादी चळवळीत एक अभ्याससूचक बौद्धिक चेहरा आणि धुरंधर रणनीतीकार म्हणून ओळख होती. त्यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये गडचिरोली येथे ६१ सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले होते. अनेक वर्षे जंगलातील नक्षलवादी चळवळीत सक्रिय राहिले. जंगलात असताना सुद्धा भुपती आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीन या प्रश्नावर काम करीत होते. मुख्य प्रवाहात परतल्यानंतर पुन्हा जंगलातील दुर्गम आणि अतिदुर्गम क्षेत्रातील आदिवासींच्या प्रश्नांसाठी, लोकशाहीच्या भूमिकेतून, काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी बी कॉम पर्यंत शिक्षण झालेल्या भूपती यांना आदिवासी समाजाच्या प्रश्नांची असलेली जाण आणि प्रत्यक्ष अनुभव लक्षात घेऊन त्यांचे नाव विद्यापीठाकडे सुचविले. भूपती यांची नियुक्ती तीन महिन्यांच्या करारावर करण्यात आली असून, त्यांना दरमहा ३० हजार रुपये मानधन मिळणार आहे.

‘एकल’ उपक्रमांतर्गत ग्रामसभांना पेसा कायदा आणि वनहक्क कायद्यानुसार असलेल्या अधिकारांची माहिती देणे, वनहक्कांचे दावे दाखल करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत करणे, दाव्यांमधील त्रुटी दूर करून ते प्रशासनाकडे सादर करण्यासाठी समन्वय साधणे, अशी त्यांची भूमिका असेल.

ग्रामसभा, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणूनही भूपती काम करतील. विशेष म्हणजे, ज्या आदिवासी भागातील प्रश्नांना ते पूर्वी एका वेगळ्या भूमिकेतून पाहत होते, त्याच भागातील नागरिकांना आता कायदेशीर मार्गाने त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या नियुक्तीला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी दुजोरा दिला आहे. बंदुकीच्या मार्गावरून लोकशाहीच्या मार्गावर आलेल्या भूपतींसाठी हा बदल भूतकाळातून वर्तमानाकडे आणि संघर्षातून समाजसेवेच्या वाटेवर झालेला एक महत्त्वाचा प्रवास ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!